बारामतीत दणदणीत विजयानंतर जनतेला दिला थेट शब्द, म्हणाल्या शेवटी…पहिल्या प्रतिक्रियेची राज्यात चर्चा!
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार.आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या. त

Baramati By Election Result : बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत त्यांना सर्व सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचा या निवडणुकीत विजय जवळपास नश्चित होता. फक्त विजेता म्हणून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याचीच वाट पाहिली जात होती. दरम्यान, या निवडणुकीत विजय मिळवताच त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी बारामतीच्या मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पाठिंबा दिलेले इतर सर्व मित्र पक्ष, विविध संस्था, संघटना यांचे आभार मानले आहेत.
हा विजय माझ्यासाठी केवळ…
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार.आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या. तसेच, आदरणीय अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती.त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या उपस्थितीची उणीव आज प्रकर्षाने जाणवते; हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून, आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची त्यांची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे, असेही त्या म्हणाल्या.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार..! तुमच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय शक्य झाला आहे. तसेच या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पाठिंबा दिलेले इतर सर्व मित्र पक्ष, विविध संस्था, संघटना यांचे मी मनःपूर्वक आभार मानते, असे म्हणत त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सोबतच शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा निर्धार कायम राहील.तरुणाई, शेतकरी, महिला, उद्योजक आणि समाजातील सर्वच घटकांना केंद्रस्थानी ठेवून बारामतीच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास….
शेवटी निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया. बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही. आपल्या सर्वांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभी राहीन, अशी मी आपणांस खात्री देते, असे आश्वासनही लोकांना दिले.