
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांची आज सर्वप्रथम पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. यावेळी पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. यानंतर आता सायंकाळी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. मात्र आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने त्यांना खासदारकी सोडावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.
आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर अन्य आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यासाठी समर्थन दिलं.
त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. आता सुनेत्रा पवार या गटनेता असलेल्या अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणार आहेत.
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपदही होते. आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद आपल्याकडेच ठेवणार की दुसऱ्या नेत्याकडे ही जबाबदारी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.