उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं? प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने चर्चांना उधाण

Maharashtra New DCM : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधनानंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज प्रफुल्ल पटेल आणि काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर पटेल काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं? प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने चर्चांना उधाण
Prafull Patel
Image Credit source: Google
| Updated on: Jan 30, 2026 | 3:56 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. बारातमीत काल अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी राज्यातील सर्वच बडे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्या जाही उपमुख्यमंत्री कोण बनणार? याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात आहे. अशातच आता प्रफु्ल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘आमचे नेते अजित पवार यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नव्हती. राजकीय दृष्टीने आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा अजित पवार यांच्याकडे होती. त्या जागेचा आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे, म्हणून त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की, येत्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर निर्णय आम्हाला करायचा आहे. यासाठी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून, जनभावनेचा आदर करून, अजित दादांची आमच्या पक्षात महत्त्वाची भूमिका होती या सर्वांचा विचार करून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं आहे.’

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवले जाणार?

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवले जाणार का? या प्रश्नावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नावाची चर्चा आज आम्ही केलेली नाही, पण तो आमचा अंतर्गत विषय आहे. कोणाला त्या जागेवर बसवाचं हा पक्षाचा निर्णय आहे. आम्ही जनभावनेचा आणि आमदारांचे मत विचारात घेणार आहोत. आमची स्व:ताची सुद्धा भावना आहेच. अजूनही राजकीय शोक आहे, घरी काही धार्मिक विधी सुरू आहेत. आम्हाला याबाबत सुनेत्रा वहिनींशीही बोलावं लागेल, पार्थ पवार, जय पवार यांच्याशीही बोलावं लागेल. घरचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू. लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. जनतेची भावना आणि सर्वांच्या भावनांच्या अनुरूप निर्णय होणार आहे. आमचा कुणाचाही त्यांच्या नावाला विरोध नाही, पण आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागणार आहे.’