
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी ते मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. अशातच आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जात जरांगे पाटलांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या ते जाणून घेऊयात.
खासदार सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर जरांगे पाटलांची भेट देण्यासाठी गेल्या होती. मात्र प्रकृती खालावल्यामुळे जरांगे पाटील यांनी सुळेंशी बोलण टाळलं. यानंतर बोलताना सुळे म्हणाल्या की, ‘जरांगे पाटलांना विकनेस आला आहे, कारण त्यांनी 4 दिवसांपासून काहीही खाल्लेल नाही. सध्या आंदोलकांच्या अन्नाचा प्रश्न सुटला आहे. मात्र येथे अस्वच्छता आहे.
सुप्रिया सुळे यांनी पुढे बोलताना म्हणाल्या की, ‘मराठा आंदोलकांनी आझाद मैदान परिसरात शौचालये आणि पाण्याची मागणी केली आहे. तसेच या भागात स्वच्छता ठेवण्याची मागणी केली बीएमसीकडे केली आहे. आंदोलकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी सरकारकडे आणि बीएमसीकडे मागणी करणार आहे.’
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलवा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अधिवेशन बोलवून निर्णय घ्या, याबाबतचे बिल पास करा आणि आरक्षण देऊन टाका. आरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे, मात्र ते आमच्यावर टीका करत आहेत. आज त्याच्याकडे 250 आमदार आहेत, ते चुटकीसरशी निर्णय घेऊ शकतात. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना बहुमत दिले आहे, त्यांनी आता निर्णय घ्यावा.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, सर्वांशी बोलून मार्ग काढावा निर्णय सरकारच्या हातात आहे. आमच्या अंगावर टाकून काय होणार आहे. सगळे पक्ष, घरं फोडून मु्ख्यमंत्री झालात, आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली मग आता निर्णय घ्या. सत्ता म्हणजे केवळ लाल बत्तीची गाडी, प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नाही, मायबाप जनतेच्या सुख दुखा:त माणूस असला पाहिजे याला खरा नेता म्हणतात असं सुळे म्हणाल्या.