लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Supriya Sule : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या लाठीचार्जच्या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका... दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या
Supriya Sule on CJP
Image Credit source: Google
| Updated on: Jul 20, 2026 | 10:38 PM

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात येत आहे. आज अभिजीत दिपके यांनी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती, मात्र आंदोलक संसदेच्या परिसरात पोहोचताच त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या लाठीचार्जच्या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. आज जंतर-मंतर येथे जे घडले ते अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारे आहे असं सुळे यांनी म्हटले आहे.

जंतर-मंतरवर घडले ते धक्कादायक

सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील लाठीचार्जवर बोलताना सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘आज जंतर-मंतर येथे जे घडले ते अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारे आहे. तेथे जमलेले तरुण गुन्हेगार नव्हते. ते विद्यार्थी होते. असंख्य कुटुंबांच्या आणि आपल्या देशाच्या आशा-आकांक्षा घेऊन पुढे जाणारे युवक-युवती. आपल्या चिंता आणि मागण्या व्यक्त करण्याचा घटनात्मक अधिकार त्यांनी शांततेच्या मार्गाने बजावला होता. मात्र, संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकशाहीत आपल्या नागरिकांशी अशा प्रकारे वागले जाऊ नये.’

पुढे आपल्या पोस्टमध्ये सुळे यांनी म्हटले की, ‘एक भारतीय, लोकप्रतिनिधी आणि आई म्हणून ही घटना मला अत्यंत वेदनादायी आणि अस्वीकार्य वाटते. त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपल्याच मुला-मुलींचे प्रतिबिंब दिसते. कोणताही पालक आपल्या मुलाला किंवा मुलीला देशाच्या राजधानीत शांततापूर्ण पद्धतीने आपला आवाज उठवल्याबद्दल मारहाण होऊन परत यावे, अशी अपेक्षा करत नाही.’

सरकारने लोकांचा आवाज ऐकावा

आपल्या पोस्टमध्ये पुढे सुळे यांनी म्हटले की, ‘लोकशाहीवर खऱ्या अर्थाने विश्वास असलेल्या सरकारने लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐकण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. सरकारने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधावा, त्यांच्या रास्त आणि प्रामाणिक मागण्यांवर अर्थपूर्ण चर्चा करून तोडगा काढावा आणि आपल्या प्रजासत्ताकाची ओळख असलेल्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करावे.’

Follow Us