
अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अशातच आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्र्वादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. मुंबईत शपथविधीची तयारी सुरू असताना बारामतीतही हालचालींना वेग आल्याचे पहायला मिळाले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार काल रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्या होत्या. यानंतर आज दुपारी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. मुंबईत ही सर्व प्रक्रिया सुरु असताना सुप्रिया सुळे या बारामतीतील अजित पवारांच्या घरी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताईंची भेट घेतली. आशाताईंची विचारपूस केल्यानंतर त्या तातडीने दिल्लीला जाण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.
पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उद्या देशाचं बजेट आहे, मी राष्ट्रवादीची फ्लोअर लीडर आहे, त्यामुळे मला जावं लागत आहे. मी आशा काकींना भेटण्यासाठी आले होते. आता मी गाडीने पुण्याला जात आहे, तिथून विमानाने दिल्लीला जाणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपधविधीबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी, मला याबाबत काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावरही त्यांनी मला काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला होता.