
Shivsena Vs BJP in Kalyan: ठाणे, कल्याण आणि मुंबईत भाजप आणि शिंदे सेनेत युतीची चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षात मात्र चांगलंच वाजल्याचं दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दावे-प्रतिदावे आणि आरोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे महायुतीतच मोठा कलह दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात बाह्या वर केल्यानं युतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाठीत खंजीर खुपसल्यापासून ते स्वबळापर्यंत सर्वच शब्दप्रयोग सुरू आहे.
शिंदे सेनेने पाठीत खंजीर खुपसला
कल्याण पूर्वेत शिवसेना भाजप पुन्हा आमने सामने आले आहेत. भाजप ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांचे शिवसेना शिंदे गटावर ‘युतीत पाठीत खंजीर खुपसल्याचा’ आरोप केला. युतीमध्ये काम करायचं आणि नंतर पाठीत खंजीर खुपसायचा. गणपतशेठ गायकवाड यांच्याविरोधात कुणाला उभं केलं. धनंजय बोनारे, महेश गायकवाड यांना उभं करण्यात आलं. त्याला 54 हजार मतं कुठून आली? असा सवाल करत त्यांनी शिंदे सेनेकडे बोट दाखवले. तर सर्वच्या सर्व पॅनलमध्ये उमेदवार उभं करण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्व ताकदीने उभे राहिले तर कुणीच आपला पराभव करू शकत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वबळावर एकदा होऊन जाऊ द्या
युतीत पाठीत खंजीर खुपसल्याच्या जगन्नाथ पाटील यांच्या आरोपानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आमच्या नेत्यांचा अपमान बंद करा.कल्याण पूर्वेत भाजपचा एकही नगरसेवक स्वबळावर निवडून येणं नाकीनऊ होतं. युतीमुळेच तो निवडून येत होता, असा टोला शिंदे सेनेने लगावला आहे. आमची ताकद दाखविण्याची वेळ आणू नका स्वबळावर एकदा होऊन जाऊ द्या. विधानसभा निवडणुकीत एक मावळा भारी पडू शकतो; सगळे जुंपले तर तुमचा सुपडा साफ होईल असे शिवसेन संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी भाजप नेते जगन्नाथ पाटील यांना सडेतोड प्रतिउत्तर देत इशारा दिला.कीकडे वरिष्ठ पातळीवर युतीबाबत बैठका, तर दुसरीकडे आरोप–प्रत्यारोपांमुळे कल्याण–डोंबिवलीतील महायुतीचे राजकारण तापलेले दिसत आहे.