मिरा-भाईंदर महापालिकेत मांसाहार बंदीवरून वाद! व्हेजवरून राजकारणाला नॉनव्हेज तडका, भाजपवर मोठा आरोप काय?

Mira Bhayandar Municipal Corporation Non Veg Dish: मिरा-भाईंदर महापालिकेत मांसाहर बंदीवरून मोठा वाद पेटला आहे. व्हेजवरून राजकारणाला नॉनव्हेज तडका बसला आहे. या वादावरून शिवसेना, काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला.

मिरा-भाईंदर महापालिकेत मांसाहार बंदीवरून वाद! व्हेजवरून राजकारणाला नॉनव्हेज तडका, भाजपवर मोठा आरोप काय?
मिरा-भाईंदर पालिकेत मांसाहार बंदीवरून वाद! व्हेजवरून राजकारणाला नॉनव्हेज तडका
| Updated on: Nov 24, 2026 | 10:18 AM

Mira Bhayandar Municipal Corporation Non Veg Dish: मिरा-भाईंदर महानगरपालिकेत सध्या जेवणाचा मेन्यू वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. महासभेतीली जेवणातून गेल्या सहा महिन्यांपासून मांसाहारी पदार्थ पूर्णपणे हद्दपार झाल्याने वाद पेटला आहे. महापालिकेत केवळ शाकाहारी जेवणाचीच व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनीच नाही तर शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील २५ वर्षांपासून मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत होती. महासभेचे कामकाज अनेकदा दुपारपर्यंत चालते. त्यामुळे नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जेवण्याची व्यवस्था करण्यात येते. अगोदर शाकाहारी आणि मांसाहारी असे जेवण देण्यात येत होते. पण गेल्या सहा महिन्यांपासून ही व्यवस्था बदलली आहे. त्यावरून नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.

नगरसेवकांमध्ये निर्णयाने नाराजी

Loading...

मिरा-भाईंदर हे मूळ आगरी आणि कोळी समाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील बहुतांश स्थानिकांचा आहार मांसाहार आहे. मासे, मटण, चिकन हे येथील लोकांच्या दैनंदिन जेवणाचा भाग आहे. पण २५ वर्षांची परंपरा मोडीत काढत शाकाहारी जेवण दिल्या जात असल्याने नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. मांसाहारावर बंदी का घालण्यात आली, असा सवाल शिवसेनेसह काँग्रेस आमदारांनी केली आहे. तर काही भाजप आमदारही या निर्णयामुळे नाराज असल्याचे सांगितले जाते. हा निर्णय आगरी-कोळी समाजाच्या खाद्यसंस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

मांसाहार का केला बंद?

राजकीय लाभासाठी हा निर्णय घेतल्याचाही आरोप होत आहे. मिरा-भाईंदरमध्ये जैन समाजाचे एकगठ्ठा मत आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जैन समाजाला खूष करण्यासाठी सत्ताधारी भाजपने हा निर्णय घेतला का, असा सवाल विचारल्या जात आहे. तर सत्ताधारी भाजपमध्ये सुद्धा या निर्णयावरून नाराजी असल्याचे सांगितले जाते. महापालिका प्रशासनाने याविषयी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. खर्चात बचत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तर काहींनी यामागे राजकीय गणित असल्याचा आरोप केला आहे. महासभेच्या ताटातून मांसाहार हद्दपार झाल्याने हा वाद आता फक्त जेवणापूरता राहिलेला नाही, तर तो खाद्यसंस्कृती आणि मतांच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे. आगामी महापालिकेच्या सभेत त्यावरून गदारोळाची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us