भाजपकडून टीका होताच एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना थेट आदेश; आता कुणीही…

विधान परिषद निकालानंतर भाजपकडून टीका होताच युतीतील तणाव वाढला. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना भाजप टीकेवर सार्वजनिकरित्या भाष्य न करण्याचे थेट आदेश दिले आहेत. वरिष्ठ पातळीवर समन्वय साधला जाईल, असे सांगत 'दोस्तीमध्ये कुस्ती नको' हा संदेश दिला.

भाजपकडून टीका होताच एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना थेट आदेश; आता कुणीही...
dcm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2026 | 1:39 PM

विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून भाजपने शिंदे सेनेवर आरोप करण्यास सुरुवात केली असून शिंदे सेनेनेही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युतीत तणाव निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना या प्रकरणावर भाष्य न करण्याचे आदेश दिले आहेत. आता कुणीही या विषयावर बोलू नका. वरिष्ठ पातळीवर आम्ही चर्चा करणार आहोत, असे आदेशच एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं शिंदेसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. आनंद परांजपे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.

शिवसेनेचा कुठल्याही प्रवक्ता, पदाधिकारी किंवा नेत्यांनी मित्र पक्षातील पक्षावर कुठल्याही प्रकारची टीका करू नये, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. भविष्यामध्ये तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय कसा राहील याची वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, हीच अपेक्षा आम्ही आमच्या दोन मित्र पक्षांकडून ठेवतो, असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.

Loading...

दोस्तीमध्ये कुस्ती नको

आम्ही चार ठिकाणी युती धर्म पाळला आहे. युती धर्म पाळत आलो आहोत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची टीका करू नये, असं एकनाथ शिंदे यांनी कालच सांगितलं आहे. दोस्तीमध्ये कुस्ती होऊ नये हीच अपेक्षा आम्ही मित्र पक्षांकडून करतो, असं परांजपे म्हणाले.

मित्र पक्षांना आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नक्कीच महायुतीच्या अधिक समन्वयावर चर्चा करतील. पण मित्र पक्षांनी देखील शिवसेनेवर कुठल्याही प्रकारचे आरोप करणं टाळलं पाहिजे. मित्र पक्षांच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी त्याबाबतची काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन परांजपे यांनी केलं.

दरेकरांनी मर्यादा ओलांडू नये

आज देखील भाजपच्या प्रवक्त्याने ज्या प्रकारचे शब्द वापरले. महायुतीसाठी ते योग्य नाही. मराठी भाषा खूप समृद्ध आहे. आमच्याकडेपण मराठी शब्दांचा खूप मोठा शब्दकोश आहे. आम्ही देखील ते शब्द वापरू शकतो, असा इशारा देतानाच महायुतीमध्ये कुठल्याही पक्षावर, कुठल्याही प्रकारची टीका होणार नाही हीच अपेक्षा आम्ही भाजप आणि राष्ट्रवादीकडून ठेवतो, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचाही समाचार घेतला. युती टिकावी की नाही हे मला वाटत नाही. दरेकर यांना वाटत असेल तर त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडून टीका करू नये, असंही त्यांनी सुनावले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us