Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत माजी नगरसेवक शिवसेना सोडून भाजपत का येत आहेत? कल्याणमधील भाजप नेत्याचा मोठा खुलासा
Kalyan-Dombivali : शिवसेनेच माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काल या मुद्यावरुन मोठा वाद पहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार टाकला. कल्याण-डोंबिवलीतल्या शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांना भाजपत प्रवेश देण्यात आला.

“केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष असल्याने या सर्वांसोबत काम केल्याने फायदा होतो. संघटना मजबूत होते. सर्व ताकद वॉर्डाच्या विकासाकरता मिळते. यासाठी सर्व पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी भाजपमध्ये येत आहेत. सन्मानाची वागणूक मिळत नाही. काम होत नाही, त्यांचे नेते त्यांचे फोन उचलत नाहीत असे मनसे ,शिवसेना, उबाठा, काँग्रेससह इतर पक्षातील नाराज कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत” असं कल्याण पश्चिमेचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले. “काल प्रवेश झालेल्या काही नेत्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की, भाजपमधील नेते आमचे फोन उचलून बोलतात. मात्र आमच्या नेत्यांचे पीए सुद्धा फोन उचलत नाहीत. यामुळे अंतर्गत नाराजी भरपूर आहे” असं नरेंद्र पवार म्हणाले.
“आमचे नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत जातात व त्यांचे आमच्याकडे येतात. शिवसेनेतला माणूस बीजेपीत गेला व बीजेपीचा माणूस शिवसेनेत आला,तरी हे दोन्ही एकाच घरातले. महायुतीच्याच घरामध्ये दोन्ही आलेत आणि यामुळे आमची ताकद वाढत आहे. आता युती झाली नाही तर नंतर सत्ता स्थापना आणि त्याचबरोबर विकास निधी आणण्याकरता आम्ही एकत्र राहणार” असं नरेंद्र पवार यांनी सांगितलं.
…तर ही वेळ आली नसती
काल शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजेश मोरे यांनी एक नंबरचा पक्ष फोडाफोडी करू नये अशा प्रकारचे वक्तव्य केलं यावर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. “भाजप फोडाफोडीचे राजकारण करत नाही. सुरुवात त्यांनी केली ती सुरुवात झाली नसती, तर ही वेळ आली नसती. राजेश मोरे यांनी आपल्या घरात काय चाललंय, याकडे त्यांनी लक्ष द्यावे. भाजप एक नंबरचा पक्ष आहे आणि या पक्षाकडे सगळ्यांचा ओघ आहे. आम्ही फोडत नाही एक नंबरच्या पक्षावर विश्वास आहे म्हणून या ठिकाणी रांग लागली आहे. कार्यकर्त्यांचं शंभर टक्के समाधान कुठलाही नेता करू शकत नाही. यामुळे कार्यकर्ते दुसऱ्या वाटेवर जातो, तोच प्रकार या ठिकाणी दिसून येत आहे” असं नरेंद्र पवार म्हणाले.
पक्षाची ताकद जास्त आहे
“युती झाली तरी महापौर भाजपचा होणार. पक्षाची ताकद जास्त आहे. आमचे जास्त नगरसेवक निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे. आमची संघटना या ठिकाणी बळकट होणार. कल्याण डोंबिवलीत संघटनेची बांधणी मजबूत म्हणून आम्हाला विश्वास व खात्री आहे, आमचा महापौर होणार. युतीत लढलो तर महापौर महायुतीचा असेल आणि एकटे लढलो तरी आमची ताकद संघटना आहे. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार” असा दावा नरेंद्र पवार यांनी केला.
