मोठी बातमी! जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच आरक्षणावर तोडगा निघणार? घडामोडींना वेग

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 तारखेला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत येणार आहे, मात्र त्यापूर्वी आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच आरक्षणावर तोडगा निघणार? घडामोडींना वेग
| Updated on: Aug 14, 2025 | 7:45 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला, त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक उपोषणं केली, मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला प्रचंड असा प्रतिसाद देखील मिळाला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे, मात्र यावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाही, त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मराठा बांधवाचा मोर्चा आता मुंबईत धडकणार आहे.

29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. 27 ऑगस्ट रोजी हा मोर्चा अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. हा मोर्चा मागच्या मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल असा विश्वासही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे यावर प्रतिक्रिया देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सरनाईक? 

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ आहे, तोपर्यंत  चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं वक्तव्य  मनोज जरांगे पाटील यांच्या लातूर येथील भेटीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत गणेशाच्या दर्शनाला यावं, आंदोलनाला मुंबईत येऊ नये, ही मंत्री म्हणून माझी भूमिका आहे.  मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये अजूनही चर्चेतून मार्ग अनिघू शकतो, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान परभणी दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत, आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र तसं काही जर झालं तर संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे.