मोठी बातमी! शिंदेंसोबत बंड महागात पडलं, भाजपमधून तीन नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शिक्षक आणि पदवीधर मिळून पाच जागांवर निवडणुका होणार आहेत. याचदरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भाजपमधून तिघांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात शिक्षक आणि पदवीधर मिळून पाच मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान या पाचही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. जे या मतदारसंघात इच्छुक होते, परंतु त्यांना तिकीट मिळालं नाही, अशा काही नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु काही जणांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे आता या बंडखोरांमुळे महायुतीमधील अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान जिथे-जिथे बंडखोरी झाली, तिथे -तिथे आता भाजपकडून अशा बंडखोर उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे.
अमरावती मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनाच पुन्हा उमेदवार देण्यात आली आहे. परंतु या मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने भाजपकडून आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित करण्यात आलं आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसड यांनी या तिघांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले आहे.
दरम्यान या तिघांना जरी पक्षातून निष्कासीत करण्यात आलं असलं तरी देखील ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अजूनही महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांचं टेन्शन कायम आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं.
