Weather Alert : भर दुपारी अंधारून आलं.. मराठवाड्यात पुन्हा विजा अन् पावसाचा धिंगाणा, वाचा कुठे कुठे अलर्ट?
हवामान विभागाने मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे वीज व वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

औरंगाबाद: शहर आणि ग्रामीण परिसरात बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील काही भागातच पाऊस मुसळधार पाऊस झाला. मात्र आता पुन्हा एकदा विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने मराठवाड्यातील (Marathwada Rain Forecast) सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
औरंगाबाद शहरावर काळेकुट्ट ढग
06 ऑक्टोबर रोजी बुधवारी भर दुपारी तीन वाजेनंतर अचानक वातावरण अंधारून आलं. आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले आणि पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली. शहरासह, वाळूज, पाचोड, खुलताबाद, कन्नड आदी भागातही जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नवरात्रीच्या तयारीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली. उद्यापासून सुरु होणाऱ्या नवरात्रीसाठी शहरातील बाजारपेठा फुलल्या होत्या, मात्र अचानक सुरु झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले.
मराठवाड्यात कुठे अलर्ट?
06 ऑक्टोबर- मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
07 ऑक्टोबर- औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा अन् वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
08 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.
09 ऑक्टोबर – बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.
10 ऑक्टोबर – उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर लातूर व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे, ही माहिती परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कृषी मौसम सेवा समन्वयक डॉ. के.के. डाखोरे यांनी दिली.
इतर बातम्या-
औरंगाबाद मनपा निवडणूक: 38 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश, यंत्रणा लागली कामाला
