Aaditya Thackeray: मेगावॅट निर्माण करता की महाराष्ट्राची मेगा वाट लावता? टोरेंट पॉवर प्रकल्पावरून आदित्य ठाकरे संतापले, थेट फडणवीसांना सुनावलं
Torrent Power Project Row: टोरेंट पॉवर प्रकल्पावरून आदित्य ठाकरे संतापले आहेत. लाखो झाडांच्या वृक्षतोडीवरून राज्य सरकारला सवाल केला आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरेंट कंपनीकडून हायड्रा पॉवर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ५० हजार झाडांची कत्तल होणार होती. या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी आणि विरोधी बाकावरील नेत्यांकडून विरोध झाल्यानंतर ही वृक्षतोड थांबवण्यात आली. आज कर्जत तालुक्यात ज्या ठिकाणी ही वृक्षतोड झाली आहे. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत,आदित्य ठाकरे आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्या ठिकाणाची पाहणी केली. यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
या नेत्यांसोबत स्थानिक ग्रामस्थ देखील होते. त्यांनी देखील या प्रकल्पाला आमचा विरोध आहे, अशी भूमिका या नेत्यांसमोर मांडली. आदित्य ठाकरे यांनी देखील स्थानिक ग्रामस्थांना आश्वस्त केलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा निसर्गाचा विध्वंसक विनाशकारी प्रकल्प नकोच, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मेगावॅट निर्माण करता की महाराष्ट्राची मेगा वाट लावता? असा आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला सवाल केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, विकासाच्या नावाखाली लाखो झाडांची कत्तल करून महाराष्ट्राचे वाळवंट करायचे आहे का? तुम्ही मेगावॅट निर्माण करत आहात की महाराष्ट्राची मेगा वाट लावत आहात? अशा शब्दांत युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी टोरेंट पॉवर प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. विकासाला आमचा विरोध नाही मात्र तो शाश्वत आणि स्थानिकांच्या हिताचा असला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
कर्जत–भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी वृक्षतोडीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. टोरेंट कंपनीशी आमचे भांडण नाही. मात्र काही झाडांना क्रमांक आहेत तर काहींना नाहीत. या जंगलातील सहा ते सात लाख झाडे तोडली जाणार आहेत असा दावा त्यांनी केला. जंगलातील नैसर्गिक झाडांचे पर्यावरणीय मूल्य भरून काढता येणार नाही. त्यामुळे स्थानिकांना विश्वासात घेऊन समोरासमोर पारदर्शक जनसुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकार वृक्षतोडीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत फेक नॅरेटिव्ह कसे तयार करायचे हे पाचशे कोटी खर्च करणाऱ्या सरकारकडून शिकावे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला आहे. स्थानिक आमदारांवर निशाणा साधताना त्यांना उद्योगांमध्ये अधिक रस आहे पण जनतेच्या प्रश्नांमध्ये रस आहे का? असा सवाल ही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ही राजवट लोकविरोधी असून जनताच ती बदलेल. स्थानिक नागरिकांच्या लढ्यात आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असेही त्यांनी स्पष्ट केले.
