मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतिश चव्हाण अन् प्रतापसिंह पाटील यांच्यात कांटे की टक्कर, कोण मारणार बाजी? उद्या मतमोजणी
राज्यामध्ये 23 ऑक्टोबर रोजी पाच विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान पार पडलं, यामध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा देखील समावेश आहे. उद्या या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

23 ऑक्टोबर रोजी राज्यातील पाच विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान झालं होतं, ज्यामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघ अशा पाच जागांचा समावेश आहे. यावेळी जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये कमी अधिक प्रमाणात बंडखोरी झाल्याने प्रत्येक मतदारसंघात मोठी चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे. उद्या या पाचही जागांसाठी मतमोजणी होणार आहे. दरम्यान यावेळी कोणत्या मतदारसंघामधून कोण बाजी मारणार? महायुतीच्या किती जागा येणार की महाविकास आघाडी धक्का देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात काय स्थिती?
मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमधून एकाचवेळी दोन उमेदवार उभे आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापसिंह पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं. तर शिवसेना ठाकरे गटाकडून दिलिप घुगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अपेक्षेप्रमाणे सतिश चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात आली. सतीश चव्हाण हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार देखील आहेत. दरम्यान गेल्यावेळी सतिश चव्हाण हे या मतदारसंघातून 57895 मतांनी विजयी झाले होते. त्यांना 116638 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे शिरिश बोराळकर यांचा पराभव केला होता.
मात्र यावेळी चित्र वेगळं आहे, कारण यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापसिंह पाटील हे निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यांना या मतदारसंघात काँग्रेसने देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढंच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही पाटील यांनाच आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघात प्रतापसिंह पाटील यांचं पारडं जड माणण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सतीश चव्हाण यांनी देखील या मतदारसंघात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघात सतीश चव्हाण विरूद्ध प्रतापसिंह पाटील असाच सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये मतोजमोजणीवेळी कांटे की टक्कर पहायला मिळण्याची शक्यता आहे.
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या, 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती संभाजीनगरातील चिखलठाणा एमआयडीसी परिसरातील ‘वुडस्टॉर्म डेकोर’ येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी 72 टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, 4,455 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडणुकीत एकूण 3,26,701 मतदारांपैकी 1,91,689 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण मतदानाची टक्केवारी 58.67 इतकी आहे. विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा दुपारी 2 वाजेपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच एखाद्या उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण केला, तर रात्रीपर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागल्यास निकालासाठी अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया आणि अंतिम निकालाकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
