Maharashtra News LIVE : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींची निदर्शने

Maharashtra LIVE Updates in Marathi : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसले होते. पाचव्या दिवशी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण संपवले. मात्र, आता ओबीसी समाज आक्रमक होताना दिसतोय.

Maharashtra News LIVE : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींची निदर्शने
live breaking
| Edited By: | Updated on: Sep 05, 2025 | 8:04 AM

गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या भेटी वाढल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापले आहे. ​ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी भेट दिल्याने म्हात्रे पुन्हा भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुकीत पॅनेल पद्धतीमुळे कल्याण डोंबिवलीत पक्षांमध्ये उमेदवारांची शोधाशोध आणि वर्चस्वासाठी रस्सीखेच सुरू आहे. या राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु आगामी काळात कल्याण डोंबिवली महापालिकेत मोठ्या प्रमाणात पक्षीय अदलाबदली होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या पैठण येथील जायकवाडी धरणातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे यावर्षीच्या पावसाळा संपण्यापूर्वीच शंभर टीएमसी क्षमता असलेल्या धरणातून तब्बल 25 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Sep 2025 06:31 PM (IST)

    कोल्हापूरमध्ये 25 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन, आरोग्य सेवेवर परिणाम

    कोल्हापूरात आरोग्य कर्मचारी रस्त्यावर..सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन

    राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी बेमुदत आंदोलन

    कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी कराव, अशी मागणी

    कोल्हापूर जिल्ह्यात 25 ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन : आरोग्य सेवेवर परिणाम

  • 04 Sep 2025 06:13 PM (IST)

    नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींची निदर्शने

    नांदेड : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे असा आरोप ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात येतोय. ओबीसी समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

  • 04 Sep 2025 06:00 PM (IST)

    सरसकटचा नाही तर, पुराव्यांचा जीआर- मुख्यमंत्री फडणवीस

    हा जीआर सरसकटचा नाही तर पुराव्यांचा असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील पुरावे ग्राह्य धरलेत, असं फडणवीस यांनी सांगितलं. खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ओबीसींवर अन्याय होणार नाही याबाबत भुजबळांना आश्वस्त केल्याचं त्यांनी सांगितलं.

  • 04 Sep 2025 05:49 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

    जीएसटी सुधारणांबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की “जीएसटीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी घेतलेला हा खूप मोठा निर्णय आहे. येणारी दिवाळी आपल्या सर्व देशवासीयांसाठी आनंदाने भरलेली असेल. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. मी  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचेही अभिनंदन करतो. इतिहासात पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा लहान व्यापारी आणि लघु उद्योजकांनाही होईल. यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल…”

  • 04 Sep 2025 05:36 PM (IST)

    दहिसर पूर्वेतील ऑर्किड प्लाझा इमारतीला आग

    दहिसर पूर्व येथील ऑर्किड प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • 04 Sep 2025 05:24 PM (IST)

    जीएसटी सुधारणांमुळे राज्यांना अडचणी येऊ शकतात: ओवैसी

    हैदराबादमधील एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जीएसटी सुधारणांवर म्हटले आहे की, “आम्हाला काळजी आहे की यामुळे राज्यांना त्रास होईल. राज्यांना याची भरपाई दिली पाहिजे, किंवा त्यांना उपकराच्या कक्षेत आणले पाहिजे.”

  • 04 Sep 2025 05:21 PM (IST)

    अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप, 4.8 तीव्रता

    अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला. त्याची तीव्रता 4.8 इतकी होती. तथापि, याआधीही अफगाणिस्तान भूकंपाने हादरला होता. भूकंपाचे धक्के इतके भयानक होते की 1400 लोक मृत्युमुखी पडले आणि 3हजारांहून अधिक लोक जखमी झाले.

  • 04 Sep 2025 05:04 PM (IST)

    जीएसटीमधील सुधारणा चांगली गोष्ट आहे, हे व्हायला हवे: मंत्री विक्रमादित्य सिंह

    हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी जीएसटीमधील सुधारणांबद्दल सांगितले की, “आम्ही आता त्याचा अभ्यास करू पण जसे दिसून येते की, 5% आणि 18% असे  दोन स्लॅब निश्चित केले आहेत. काही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे त्यांचा वापर निश्चितच वाढेल. ‘

  • 04 Sep 2025 04:55 PM (IST)

    आम्हाला या भ्रष्ट पालिकेत राहायचं नाही…केडीएमसी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेवर नागरिकांच्या हरकती

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हजारो नागरिकांनी लेखी आक्षेप दाखल केले असून यात सर्वच राजकीय पक्षांचा सहभाग आहे. या हरकतींमध्ये सर्वाधिक आक्षेप २७ गावांच्या प्रश्नावर आहेत. “आम्हाला या भ्रष्ट पालिकेत राहायचं नाही” असे एकमुखी मत नागरिकांनी नोंदवले आहे, ज्यामुळे २७ गावांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकट्या २७ गावांमधून सुमारे साडेतीन ते चार हजार हरकती दाखल झाल्या आहेत. आता या सर्व हरकतींवर पालिका आणि निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • 04 Sep 2025 04:40 PM (IST)

    कांदिवलीमध्ये ज्येष्ठ नागरिकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

    मुंबईतील कांदिवली भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुकान रिकामे करण्याच्या वादातून हा प्रकार घडला असून, मारहाण करणारा व्यक्ती समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी पीडित व्यक्ती वैद्यकीय उपचारासाठी गेल्याचे सांगितले. पीडित व्यक्ती परत आल्यानंतर तक्रार नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

  • 04 Sep 2025 04:29 PM (IST)

    शिमला येथे दरड कोसळून जळगावच्या तरुणीचा मृत्यू

    हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झालेल्या एका दुर्दैवी घटनेत जळगाव शहरातील एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी रामचंद्र विराणी (वय २५) असे या तरुणीचे नाव आहे. ती पुण्यातील एका खासगी आयटी कंपनीत नोकरी करत होती. ती आपल्या काही मैत्रिणींसोबत शिमला येथे पर्यटनासाठी गेली होती. प्रवासादरम्यान त्यांच्या बसवर मुसळधार पावसामुळे अचानक दरड कोसळली. या अपघातात लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीचे कुटुंबीय तात्काळ शिमला येथे रवाना झाले आहेत. तिच्या पार्थिवावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.  या घटनेमुळे विराणी कुटुंबावर आणि तिच्या मित्र-परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  • 04 Sep 2025 04:14 PM (IST)

    मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सीएनजी गॅस लिकेज, मोठा अनर्थ टळला

    मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या एका कारमधून सीएनजी गॅस लिकेज झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कार्यवाही करत गॅस गळती थांबवली, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

  • 04 Sep 2025 03:55 PM (IST)

    केडीएमसी प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस!

    केडीएमसी प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस पडला आहे. हजारो नागरिकांनी लेखी आक्षेप  घेतला आहे. सर्वच पक्षांनी यात सहभाग घेतला आहे. 27 गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. “आम्हाला भ्रष्ट पालिकेत राहायचं नाही असे नागरिकांनी म्हटले आहे.

  • 04 Sep 2025 03:39 PM (IST)

    जळगाव महापालिकेची नवीन प्रारूप रचना जाहीर, उमेदवार धास्तावले

    जळगाव महापालिकेची प्रारूप रचना जाहीर झाली असून १५ सप्टेंबरपर्यंत हरकती मागविल्या आहेत. नव्या बदलांमुळे अनेक इच्छुक उमेदवारांची गणिते कोलमडली असून, त्यांना आता नव्याने प्रभाग निवडण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येत आहे.

  • 04 Sep 2025 03:28 PM (IST)

    भूजबळ यांची समजूत फडणवीस घालतील – प्रवीण दरेकर

    ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागतोय याबाबत शंका असल्याने भूजबळ नाराज, त्यांचं मतपरिवर्तन फडणवीस करतील असे भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

  • 04 Sep 2025 03:20 PM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डी विमानतळावर जोरदार स्वागत

     

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डी विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवल्यानंतर विखे- पाटील प्रथमच मतदारसंघात दाखल झाले आहेत.

  • 04 Sep 2025 02:55 PM (IST)

    मतासाठी समाज पेटवण्याचं काम करु नये; शहाजी बापू पाटीलांचा भुजबळांवर निशाणा

    छगन भुजबळ साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे मतासाठी समाज पेटवण्याचं काम त्यांनी करू नये प्रसिद्धी आणि निवडणूक या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात काही नाही अशी टीका आमदार शहाजी बापू पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे.

  • 04 Sep 2025 02:39 PM (IST)

    नाशिक जिल्ह्याला दोन दिवसांचा ऑरेंज अलर्ट

    हवामान विभागाकडून प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याला दोन दिवसांचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग केला जाणार आहे.

  • 04 Sep 2025 02:25 PM (IST)

    शिर्डी विमानतळावर विखें पाटलांचे भव्य स्वागत

    मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मतदारसंघात आगमन झाले आहे. शिर्डी विमानतळावर दाखल होताच विखें पाटलांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे.

  • 04 Sep 2025 02:15 PM (IST)

    शिंदेच्या सेनेला मोठा धक्का, नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपची मोठी खेळी जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती समजले जाणारे माजी नगरसेवक अमित सरैया करणार भाजपमध्ये प्रवेश.

  • 04 Sep 2025 01:56 PM (IST)

    धुळे शहरात रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे; खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी

    गणपती विसर्जनाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत मात्र अद्यापही धुळे शहरात विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसत आहेत. शहरातील विविध भागातून गणेश उत्सवानिमित्त येणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

  • 04 Sep 2025 01:47 PM (IST)

    धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीने मराठा समाजाला देण्यात आलेल्या जीआरची होळी

    धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीने केली मराठा समाजाला देण्यात आलेल्या जीआरची होळी करण्यात आली. जीआर रद्द करण्याची ओबीसी समाजाची मागणी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची ओबीसी समाजाची मागणी आहे.

     

  • 04 Sep 2025 01:35 PM (IST)

    जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

    जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हीसीद्वारे उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

     

  • 04 Sep 2025 01:11 PM (IST)

    ओबीसींनी उपोषण सोडलं, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची घोषणा

    ओबीसींनी उपोषण सोडल्याची ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी घोषणा केली आहे. ओबीसींच्या 12 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. याबद्दल मंत्री अतूल सावे यांनीही माहिती दिली आहे.

  • 04 Sep 2025 12:43 PM (IST)

    बाणगंगा येथे मूर्ती विसर्जन करण्यासाठी कोर्टाचा नकार

    बाणगंगा येथे मूर्ती विसर्जन करण्यासाठी कोर्टाने नकार दिला आहे. संजय शिर्के यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. गेली अनेक वर्षे बाणगंगा येथे मूर्ती विसर्जित करत आहेत, असे याचिकेत नमूद केले होते. त्यानुसार बाणगंगा हे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारे ठिकाण आहे आणि हे टुरिस्ट प्लेस म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे विसर्जन करता येणार नसल्याचा प्रतिवाद सरकारी वकीलातर्फे करण्यात आला. त्याच धर्तीवर बाणगंगा येथे विसर्जन करण्यासाठी न्यायालयाने नकार दिला.

  • 04 Sep 2025 12:32 PM (IST)

    गोंदिया- गणेश विसर्जन आणि ईद मिरवणूक ध्वनीमुक्त ठेवण्याचं आवाहन

    गोंदिया- गणेश विसर्जन आणि ईद मिरवणूक ध्वनीमुक्त ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. डीजे वाजवताना सुप्रीम कोर्ट गाइडलाइन्सचे पालन करा, असं पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितलं. नियम मोडल्यास डीजे मालक आणि मंडळांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.

     

  • 04 Sep 2025 12:20 PM (IST)

    ओबीसी आणि मराठ्यांना न्याय देण्याचं काम फडणवीसांनी केलं- सावे

    “ओबीसींच्या बारा मागण्या पूर्ण करण्यात येणार. महाज्योतीच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करणार. ओबीसी आणि मराठ्यांना न्याय देण्याचं काम फडणवीसांनी केलं. सरकार ओबीसींच्या पूर्णपणे पाठिशी असून विनंतीला मान देऊन उपोषण सोडा,” असं आवाहन अतुल सावेंनी केलं.

  • 04 Sep 2025 12:10 PM (IST)

    मंत्री अतुल सावे ओबीसींच्या उपोषणस्थळी

    मंत्री अतुल सावे ओबीसींच्या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलंय. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींना धक्का लागणार नाही, असं ते म्हणाले.

  • 04 Sep 2025 11:57 AM (IST)

    मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला..

    नाशिक – ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला. भुजबळ फार्म ह्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.  छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिकेवरून प्रशासन अलर्ट झालं असून  मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

  • 04 Sep 2025 11:44 AM (IST)

    नागपूर – मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल

    मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी नागपूरमध्ये आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी प्रमुख मागणी करत आंदोलकांचे साखळी उपोषण सुरू आहे.

  • 04 Sep 2025 11:25 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी येथे प्रवासी निवाऱ्यासाठी चक्काजाम आंदोलन सुरू

    अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी येथे प्रवासी निवाऱ्यासाठी चक्काजाम आंदोलन सुरू आहे.  जुना प्रवासी निवारा पाडल्यामुळे त्याच ठिकाणी नव्याने प्रवासी निवारा बांधण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.  अंजनसिंगी येथील आंदोलनात हजारो नागरिकांची उपस्थिती, संपूर्ण गावकऱ्यांनी गाव बंद करून रस्त्यावर येऊन सगळे गावकरी रस्त्यावर बसले.

  • 04 Sep 2025 11:14 AM (IST)

    Manoj Jarange Patil : भुजबळ पक्षाचं, कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस – जरांगे यांची टीका

    भुजबळ पक्षाचं, कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.

  • 04 Sep 2025 10:58 AM (IST)

    भुजबळांनी राजीनामा द्यायला हवा-संजय राऊत

    भुजबळ हे नाराज आहेत की नाही, यापेक्षा ते मंत्रिमंडळात समाधानी आहेत, असे दिसते. भुजबळ हे नाराज असतील तर ते राजीनामा देतील का? जर एखाद्या समाजावर अन्याय झाला आणि आपण त्या समाजाचे नेतृत्व करतो तर ते राजीनामा देणार आहेत का? त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे.  भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या कारणासाठी मी राजीनामा देत आहे हे स्पष्ट केले पाहिजे. कॅबिनेटवर जर भुजबळ बहिष्कार टाकत असतील तर स्वाभिमान आणि नैतिकतेला धरून भुजबळांनी राजीनामा द्यायला हवा असा टोला संजय राऊतांनी लगावला.

  • 04 Sep 2025 10:42 AM (IST)

    अश्लिल नृत्य केल्याप्रकरणात आयोजकांवर गुन्हा दाखल

    वसईत गणपती मंडळाच्या समोरच तृतीयपंथी चा अश्लिल डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पूर्व चिंचोटी करमाळपाडा येथील बजरंग मित्र मंडळाच्या गणपतीत ” चहल जवानी” या गाण्यावर अश्लील हावभाव करीत तृतीयपंथीयांना डान्स केला आहे. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आयोजक आणि तृतीयपंथी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजयकुमार शाहू, मुरारी मिश्रा यांच्यासह 6 तृतीयपंथी वर हा गुन्हा दाखल झाला आहे.

  • 04 Sep 2025 10:29 AM (IST)

    घरगुती गणेशोत्सवात साकारला पंढरीच्या वारीचा देखावा

    गोंदियातील सिव्हिल लाईन परिसरातील जरोदे कुटुंबीयांची आगळीवेगळी थीम चर्चेचा विषय ठरली आहे. घरगुती गणेशोत्सवात त्यांनी पंढरीच्या वारीचा देखावा साकारला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीभावाचा अनोखा संदेश दिला.बळीराजाला समृद्धी मिळावी म्हणून विशेष प्रार्थना केली.

  • 04 Sep 2025 10:21 AM (IST)

    सोयाबीनच्या उभ्या पिकात सोडली जनावरे

    सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये शेतकऱ्याने चराईसाठी जनावरे सोडली. सेलू तालुक्यातील केळझर येथील शेतकऱ्याने सोयाबीनच्या शेतात जनावरे सोडली. उत्पन्न होण्याची आशा मावळल्याने सोयाबीनच्या पिकात जनावरे सोडली.

  • 04 Sep 2025 10:10 AM (IST)

    वसई-विरारमध्ये पावसाची हजेरी

    वसई विरारमध्ये सकाळच्या वेळेत रिमझिम पावसाने हजेरी लावली. रिमझिम पावसासह अधूनमधून अचानक जोरदार पाऊस पडत आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्याची तारांबळ उडत आहे.

  • 04 Sep 2025 10:00 AM (IST)

    सोन्याची जोरदार मुसंडी

    सोन्याचा भाव गेल्या चार दिवसात वाढला आहे. सोने या काळात 2000 रुपयांहून अधिकने वाढले आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 1 सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव 930 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला. 2 ,सप्टेंबर रोजी हा भाव 210 रुपयांनी 3 सप्टेंबर रोजी 880 रुपयांनी तर आज सकाळी यामध्ये वाढ दिसून येत आहे.

  • 04 Sep 2025 09:52 AM (IST)

    वसई विरारमध्ये रिमझिम पावसाची हजेरी

    रिमझिम पावसासह अधूनमधून अचानक जोरदार पाऊस पडत आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्याची तारांबळ उडत आहे. नालासोपारा पश्चिममध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.

  • 04 Sep 2025 09:23 AM (IST)

    प्रभाग रचने विरोधात 61 तक्रारी ठाण्यात नागरिकांच्या सूचनांसाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत

    आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी पालिका प्रशासनाने नुकतीच प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे .त्यानंतर नागरिकांकडून या रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या 3 सप्टेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार या प्रारूप प्रभाग रचनेवर 61 हरकती नोंदवल्या गेल्या आहेत….

  • 04 Sep 2025 09:12 AM (IST)

    अंतरवालीत ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवस

    मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरकारनं याचं लेखी आश्वासन द्यावं यासह इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी मध्ये ओबीसी आंदोलकांनी उपोषणाला सुरुवात केली होती आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे.

  • 04 Sep 2025 08:56 AM (IST)

    अहिल्यानगर महानगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

    अहिल्यानगर महानगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. 17 प्रभागासाठी 68 जागेवर होणार निवडणूक, तर 4 सदस्यांचा असणार प्रभाग. 2011 च्या जनगणनेनुसार नव्याने करण्यात आली प्रारूप प्रभाग रचना. शहरातील 17 प्रभागात बऱ्यापैकी करण्यात आले फेरबदल. दिलेल्या नियमानुसार नदी, महामार्ग न ओलांडता करण्यात आली प्रारूप प्रभाग रचना.

     

  • 04 Sep 2025 08:50 AM (IST)

    विसर्जनस्थळांवर एकूण १७९३९ मूर्तींचे विसर्जन

    गौरी आणि गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १७९३९ मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात, १६९४४ गणेश मूर्ती तर, ९९५ गौरी मूर्ती होत्या. त्यात, १२७ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचाही समावेश आहे. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे व गौरी मूर्तींचे विसर्जन केले. एकूण मूर्तींपैकी १०५१० मूर्ती पीओपीच्या तर, ७३९२ मूर्ती शाडू मातीच्या होत्या.

  • 04 Sep 2025 08:36 AM (IST)

    बंगल्यात 33 लाखांच्या दागिन्यांची चोरी

    नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे चोरांनी बंगल्यात 33 लाखांच्या दागिन्यांची चोरी करून, बंगल्यात असणाऱ्या दुकानाला आग लावून फरार झाल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकऱणी नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आठ तासांच्या आत चार आरोपीना अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे.

  • 04 Sep 2025 08:22 AM (IST)

    चापानेर येथील धरण पूर्ण क्षमतेने भरले

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील चापानेर येथील धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सद्यस्थितीला या धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.

  • 04 Sep 2025 08:07 AM (IST)

    पावसाळ्यात तीन वेळा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या पैठण येथील जायकवाडी धरणातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे यावर्षीचा पावसाळा संपण्यापूर्वीच शंभर टीएमसी क्षमता असलेल्या धरणातून तब्बल 25 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यावर्षी पावसाळ्यात तीन वेळा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.

  • 04 Sep 2025 08:04 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत ‘गणपती दर्शन’ ठरले राजकीय ‘दर्शन’

    कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात ‘गणपती दर्शन’ ठरले राजकीय ‘दर्शन’. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या भेटी वाढल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी भेट दिल्याने म्हात्रे पुन्हा भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करणार का? चर्चांना उधाण