
अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तसंच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा म्हणजेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मोसमी पाऊस शनिवारी केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभाहाने दिली. यंदा मोसमी वारे केरळमध्ये सरासरी वेळेच्या आठ दिवस आधी आणि मागील 16 वर्षांच्या तुलनेत लवकर दाखल झाले आहेत. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
पुणे शहरात पुन्हा पावसाला सुरुवात
गेल्या आठ दिवसापासून राहून राहून पुणे शहरात पावसाची हजेरी
आज दिवसभर पावसाने घेतली होती विश्रांती
मात्र 7 वाजलेपासून शहरात पून्हा पावसाला सुरुवात
पुढील 2 तास हलक्या स्वरुपाच्या पावसाचा इशारा
जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
सलग दुसऱ्या दिवशी जोरदार मुसळधार पाऊस
अंबड शहराला पावसाने चांगलंच झोडपलं
दुसरीकडे बदनापूर शहरातील रस्ते देखील झाले जलमय
जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलं
लासलगाव येथे वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजरी
अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची धावपळ
आठवडे बाजार असल्याने वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे दुकानदारांचे नुकसान
नाशिकच्या अनेक भागांना पावसानं झोडपलं
पुणे-सोलापूर महामार्गाला ओढ्याचं स्वरूप आलं आहे. भिगवणमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. इंदापूर तालुक्यात पावसामुळे झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भिगवणमध्ये मुसळधार पावसामुळे घरांत पाणी शिरलंय. तसेच रस्त्यांवर पूरसदृश स्थिती पाहायला मिळत आहे. भिगवणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने थैमान घातलंय.
मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय झाला आहे.विशेषतः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडवर पाणी साचलंय. जवळपास 3 किलोमीटरपर्यंतचा हा सर्विस रोड पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. संपूर्ण भिगवण बसस्टँड परिसरात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भिगवणच्या थोरात नगर भागात रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरण ताजा असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परभणीच्या एका 22 वर्षीय विवाहितेने पुण्यात आत्महत्या करत स्वत:ला संपवलं आहे. पूजा निर्वळ असं या विवाहितेचं नाव होतं. पूजा 3 महिन्याची गरोदर होती. या सर्व प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तर ही आत्महत्या नसून हुंड्यासाठी खून झाल्याचा आरोप पूजा निर्वळच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. तसेच पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोपही केला जात आहे. 50 हजार हुंड्यासाठी सतत तगादा लावण्यात आला. या सततच्या मागणीला कंटाळून पूजाने स्वतला संपवलं, असा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे.
ज्याला सभासद नोंदणी करायची आहे त्यांनी पक्षात रहा ज्याला सभासद नोंदणी करायची नसेल त्यांनी पक्षाच्या बाहेर जा असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
ऑपरेश सिंधूरच्या यशस्वी कामगिरीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. जो भारतावर वाकडी नजर करेल… त्याला मातीत जावं लागेल… हे भारताने ऑपरेश सिंधूरच्या माध्यमातून करून दाखवलं. ऑपरेश सिंधूरने प्रत्येक भारतीयांच्या मनात आत्मसन्मान आणि आत्मविश्वास निर्माण केला असे शिंदे म्हणाले.
रविवारी २५ मे रोजी मुंबईतील माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ या वेळेत अप व डाऊन दोन्ही धीम्या मार्गांवर रेल्वे सेवा प्रभावित राहणार आहे. सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०:१४ ते दुपारी ३:५२ दरम्यान सुटणाऱ्या स्लो मार्गावरील लोकल्स फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर या गाड्यांना अतिरिक्त थांबे दिले जात आहेत. नंतर त्या पुन्हा स्लो मार्गावर वळवण्यात येतील.
वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. पहिल्यादिवसापासूनच या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचेही नाव घेतले जात होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबर पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता जालिंदर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत
निलेश चव्हाणविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. निलेश चव्हाणने कस्पटे कुटुंबाला बंदुक दाखवून धमकावलं होतं. त्यावरून आता निलेश चव्हाणविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
ठाण्यातील कोपरी परिसरात 63 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह विहीरीत तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या बद्दलचा अधिक तपास सुरु आहे.
महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसेशी युतीचा प्रयोग एकदा व्हावा. राज ठाकरे याच्यांशी युतीबाबत चर्चा होईल, असे संजय राऊत म्हणाले.
मान्सूनपूर्व पावसाने कांदा उत्पादकांचा वांदा झाला आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा ओला झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 60 ते 70 टक्के नुकसान झाले आहे. कांद्याचा पंचनामा करत प्रतिक्विंटनला दोन हजार रुपये नुकसान भरपाई पोटी अनुदान देण्याची मागणी करण्यात येत आहे.
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हा जामिनावर बाहेर आला आहे. त्याने बाहेर येताच शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्याने वाल्मिकला तुरुंगात सर्व सोयी-सुविधा मिळत असल्याचा दावा केला. वाल्मिकला फरसान, तेल लावलेल्या चपात्या, बुधवारी आणि रविवारी चिकन दिले जात असल्याचा दावा कासले याने केला.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे यांनी वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली. 17 मे ला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवल्याने त्याचा मुलगा सुशील हगवणे हा फरार झाला होता त्यादरम्यान याच बोलेनो वाहनातून त्याने अनेक ठिकाणी प्रवास केला होता. बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे.
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराचे कौतुक केले. जगाला भारताची शस्त्रांची ताकद दिसली असे ते म्हणाले. त्यांनी दहशतवादाविरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याची ग्वाही दिली.
ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाविरोधात जगभरात मोठा विश्वास तयार झाला आहे. भारताची एकजुटता दिसून आली. ऑपरेशन सिंदूरमुळे आपल्या माना उंचावल्या. भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मन की बात कार्यक्रमात त्यांनी भावना व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्था सुप्रीम कोर्टाकडून जाहीर झाल्यात. त्या सरकार कडून जाहीर झालेल्या नाहीत, सरकारच्या मनात असत तर अजून चार वर्षे रखडविल्या असत्या , पण कोर्टाने दणका दिला त्यामुळे त्यांना आता महानगर पालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांना घ्याव्या लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न राहील, स्थानिक लेवल ला सर्वांना एकत्र बसवून निर्णय घेऊ, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
एनडीए मुख्यमंत्री परिषदेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन सिंदूरवर ठराव मांडणार आहे.
ओपरेशन सिंदूर या कारवाईच्या यशस्वी नेतृत्वासाठी पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन करणार आहे.
कृषी विभागाच्या पथकाने अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील कृषी केंद्रचालकाचे गोदाम व त्याचे चारचाकी वाहनातून प्रतिबंधित एचटीबीटीची १११ पाकिटे जप्त केली आहे. या प्रकरणी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धामणगाव गढी येथील मंगलमूर्ती कृषी केंद्रात ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरीत होत असलेल्या अवकाळी पावसामुळे हंगाम संपण्यापूर्वीच मासेमारीला ब्रेक लागला आहे. वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका बंदरांमध्ये दाखल आहे. यावर्षीचा मच्छिमारी हंगाम तोट्यात आहे.
पावसाळी वातावरणामुळे कास पठाराकडे पर्यटक येऊ लागली आहेत. काही हुल्लडबाज पर्यटक रस्त्यामध्येच गाडी लावून डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे बाहेरून येणारे पर्यटकांना त्याचा नाहक त्रास होताना पाहायला मिळत आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला महापूर येईल, हा महाराष्ट्र सरकारचा दावा खोटा आहे, असे कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार गोविंद काळजोर यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली- थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अशोका हॉटेलमध्ये दाखल होणार आहेत. पंतप्रधानांच्या स्वागताची जबाबदारी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार पंतप्रधानांचं स्वागत करणार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, किरण रीजिजूदेखील मोदींचं स्वागत करणार आहेत. थोड्याच वेळात अशोका हॉटेलमध्ये एनडीएची बैठक पार पडणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची युवासेनादेखील मैदानात उतरल्याचं एका बॅनरवरून समोर आलं आहे. युवा सेना चषक 2025 याचं आयोजन कामगार मैदानात युवा सेनेकडून करण्यात आलं आहे. याच मैदानात शिवसेना ठाकरे गटाकडून लढणार आणि जिंकणार अशा आशयाचं बॅनर लावलं आहे.
शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबई महापालिकेची पहिल्यांदा निवडणूक होणार आहे. महापालिकेवर भगवा झेंडा फडकविण्यासाठी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे.
पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीच्या चंदन उटी पूजेतून मंदिर समितीला 14 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली. गुढीपाडव्या दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची चंदन उटी पूजेची सुरुवात झाली तर त्याची सांगता 13 जूनला होणार आहे.
30 मार्च ते 12 जून दरम्याच्या 43 दिवसांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेसाठी 53 किलो चंदनाचा वापर करण्यात आला असून मंदिर समितीला 14 लाख रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं आहे.
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, अमेरिका, चीन, जर्मनीनंतर भारत चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती निती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांनी दिली. भारताने जपानला मागे टाकत चौथं स्थान मिळवलंय.
ठाण्यातील घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात एमएमआरडीए ,एमएसआरडीसी, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं सुरू आहेत. यंदा घोडबंदर रोड पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याची धास्ती घेत पालिका प्रशासनाने कापूरबावडी ते गायमुखपर्यंत दोन्ही मार्गिकांवर पाणी साचून नये यासाठी लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या ७ अभियंत्यांची नेमणूक केल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोड यांनी काढले आहे.
पुणे- मंगळवार पेठेत पहाटे गोळीबाराची घटना घडली आहे. भीमनगर कमानीजवळ रोहीत माने याने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूसं जप्त करण्यात आले आहेत. तर त्याचा साथीदार कासीम अन्सारी याला देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात वैष्णवीचे दोन भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसंच एक मैत्रीण असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसंच स्त्रीधन म्हणून वैष्णवीला दिलेली चांदीची भांडी (पाच ताटं,पाच तांबे, चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेले चांदीचं ताट) जप्त करण्यात आले आहेत. आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हागवणे यांच्याकडे परवानाधारक शस्त्र असल्याने ते दोन्ही शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.
मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून पावसाचा आनंद घेण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात समुद्रकिनारी अनेक मुंबईकर भिजत, सेल्फी घेत वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी जमले आहेत.