
उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार असून यावेळी ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात सामना आहे. सध्या लोकसभेत 542 सदस्य आहेत, एक जागा रिक्त आहे. राज्यसभेत 239 सदस्य असून 5 जागा रिक्त आहेत. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मिळून एकूण खासदारांची म्हणजेच मतदारांची संख्या 781 आहे. बहुमतासाठी ३९१ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पण, ‘बीआरएस’ने सोमवारी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. लोकसभेत या पक्षाचा एकही खासदार नसला तरी राज्यसभेत 4 सदस्य आहेत. शिवाय, बिजू जनता दलानेही कोणाच्याही पारड्यात मत न देण्याचा निर्णय घेतल्याने आज राज्यसभेतील या पक्षाचे 7 खासदार मतदान करणार नाहीत.
दुसरीकडे नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीविरोधात तरुणांनी राजधानी काठमांडूसह इतर ठिकाणी केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागून 19 जणांचा मृत्यू झाला. तसंच 300 जण जखमी झाले. हिंसक निदर्शनांनंतर नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला. नेपाळ सरकारने गुरूवारपासून फेसबुक, व्हॅाट्सॲप, एक्स, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यांसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे.
यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
पुणे – केंद्र सरकारच्या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर पुतळ्यासमोर जनआंदोलन करण्यात येत आहे. या कायद्याच्या नावाखाली सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याच निषेधार्थ आज राज्यभरातील पक्षाचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. महायुतीमधील काही पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आज उद्योग मंत्री उदय सामंत पुण्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की महायुतीसोबत यावर कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. त्यानंतर आगामी निवडणूक धोरणांवर चर्चा होईल. प्रभाग रचनेनंतर महायुतीमध्ये निर्माण झालेली नाराजी पाहता ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार.. सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता…. आरोपींच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर देखील आज निर्णय येण्याची शक्यता
मानपाडा ते फाउंटनपर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा… गेल्या वीस मिनिटांपासून ठप्प वाहतूक, वाहनचालक हैराण… सकाळी कामावर जाणारे प्रवासी, चाकरमाने यांच्यासह हजारो वाहने अडकले… घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे… वाहतूक पोलिसांचा शर्थीचा प्रयत्न, मात्र कोंडी कायमच…
ठाणे जिल्ह्यात अलीकडेच राबवण्यात आलेल्या एका विशेष कर्करोग तपासणी मोहिमेमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तपासणी केल्यानंतर मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे शेकडो संशयित रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये आठ लाख 44 हजार 211 नागरिकांची तपासणी केली असता 243 रुग्ण कर्करोगसंदर्भातील संशयित आढळली असून यापैकी 75 रुग्ण ग्रामीण भागाचे असून बाकी 168 संशयित पालिका कार्यक्षेत्रातील आहे..
अवैध वाळू उपसा करणारे २ बार्ज आणि २ सक्शन पंप जप्त करत तब्बल ३४ लाखांचे साधनसामग्री केली नष्ट… उल्हास नदीच्या मोठा गाव खाडीत गस्तीदरम्यान कारवाई … धडक कारवाईदरम्यान माफियांचा पाण्यात उड्या मारून पलायन… नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व कोतवालांचे संयुक्त पथक अॅक्शनमोड वर येत एक पंप पाण्यात बुडवला – उर्वरित गैस कटरने केले उध्वस्त
दिवाळी व छटपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुण्याहून राज्यातील नागपूर, लातूरसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांसाठी ३०० विशेष गाड्यांचे आयोजन केले आहे. त्यात लातूर व नागपूरसाठी ९४ विशेष फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या गाड्या पुणे, हडपसर, खडकी स्थानकांहून रवाना होणार आहेत.
सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार. सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता. आरोपींच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर देखील आज निर्णय येण्याची शक्यता.
शहराच्या मध्यवर्ती भागासाठी महत्त्वाचा असलेला भिडेपूल आज पहाटेपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद होत आहे. मात्र, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी हा निर्णय झाला असून हे काम १० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत चालेल.
जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या बेडरूममध्ये छताचा स्लॅब कोसळला . मोठा अपघात टळला 1969 मध्ये बांधलेली चैतन्य इमारत जीर्णावस्थेत. पावसाने परिस्थिती बिकट तळमजल्यावर पाणी, पिण्याच्या टाकीत दुर्गंधी
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी इंडिया अलायन्सचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला आहे. ते देशाचे १७ वे उपराष्ट्रपती असतील.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, इब्राहिम झदरन, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गझनफर, फजलहक फारुकी
आशिया कप 2025 स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमध्ये होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.
झोपण्याच्या कारणावरून कैद्याला बेदम मारहाण झाल्याची घटना पुण्याच्या येरवडा कारागृहात घडली आहे. किरकोळ वादाने अखेर मोठे रूप धारण केले आणि शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा आणि शिस्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मारहाण झालेल्या कैद्याचे नाव संजय भिकाजी कापडे (वय 52) असून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर, हल्ला करणारा कैदी भरत विशाल राठोड आणि मोहम्मद गुलाब शेख हे दोघे न्यायालयीन कोठडीत असून त्यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.
कतारची राजधानी दोहामध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे वृत्तसंस्था एपीने म्हटले आहे. या दुर्घटनेत जीवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेपाळमध्ये जनरेशन झेडचे निदर्शने सुरूच आहेत. भैरहवा येथील गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळावर निदर्शकांनी आग लावली आहे. मंगळवारी संध्याकाळी निदर्शकांनी विमानतळावर आग लावली. सुमारे 1000 निदर्शक विमानतळ परिसरात घुसले. त्यांनी विमानतळाची तोडफोड केली आणि चार सरकारी वाहनांना आग लावली. काही सुरक्षा वाहनांचेही नुकसान झाले.
जनसुरक्षा कायदा 2024 च्या विरोधात मविआकडून बुधवारी भाईंदरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. भाईंदर पश्चिम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 6 आरोपींना काल रात्री अटक कोली होती.त्यानंतर या आरोपींना आज न्यायलयात हजर केलं. अमन पठाण ,सुजल मेरगु, बंडू आंदेकर ,स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर अशी या आरोपींची नावं आहेत.
मला आनंद आणि अभिमान आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं आहे. सीपी राधाकृष्णन हे बहुमताने निवडून येतील, असा मला विश्वास आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो
एनडीएचे जेवढे खासदार आहेत त्यापेक्षा जास्तीच मतदान सीपी राधाकृष्णन यांना होईल. त्यांना जास्तीचे मतदान मिळेल. ते प्रचंड बहुमताने विजय होतील, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला.
यवतमाळ जिल्ह्यात कॉग्रेसला खिंडार पडले असून बंजारा समाजचे नेते काँग्रेस प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी कॉग्रेसला रामराम केला आहे. ते 13 सप्टेंबरला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यवतमाळला करणार भाजपात प्रवेश करणार आहेत.
डोंबिवली महापालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रावर नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने नागरिकांनी गोंधळ घातला आहे. सकाळपासूनच या केंद्रावर जन्म-मृत्यू दाखल्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकाच कर्मचाऱ्यावर फॉर्म घेणे-देणे आणि भरून घेण्याची जबाबदारी असल्याने तासन्तास रांगेत उभे राहून नागरिकांचा संयम सुटल्याने गोंधळ सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आढावा बैठक होती. या बैठकीत विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला गेला.महायुती म्हणून आगामी निवडणूका लढण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. तिन्ही पक्षांमघ्ये चांगला समन्वय असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रामध्ये की राजकारणासाठी धार्मिक वाद वाढवला जातोय. ही आमच्या महाराष्ट्राची ओळख नव्हती
आज असं केलं जात आहे की एका विशिष्ट समाजाला विभागणी करायची आणि समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकारण करायचं. ही प्रवृत्ती वाढलेली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
कालपासून नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये तरुणांचे आंदोलन सुरु आहे. नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजिनामा दिला असून ते अज्ञातस्थळी गेले आहेत. त्यानंतर बालेन शाह यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी तरुणांकडून झाली. आता बालेन शाह यांना सध्याची राजधानी काठमांडूचे महापौर बनवण्यात आले आहे.
गोंदियामधील एनएचएम कर्मचाऱ्यांचा गेल्या 23 दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण न झाल्याने संप तीव्र झाला आहे. ग्रामीण रुग्णांना मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयात यावे लागत आहे. उपचारासाठी रुग्णांची जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढत आहे.
मुरबाड नगरपंचायती मधील परिवर्तन पॅनल शिवसेनेत आले आहे. माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यांनी हाती घेतले धनुष्यबाण.
पुण्यात शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी, गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेतला. त्यांनी वनराज यांचा खून करणारा आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली. आयुष कोमकर क्लास सुटल्यानंतर पार्किंगमध्ये येताच आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणात 8 जणांना अटक झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर येथे पोलिस आणि शेतकरी आमने सामने आले. पोलिसांचे बॅरिकेट हटवून शेतकरी संगमनेरच्या प्रांत कार्यालयाच्या आवारात घुसले. भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकऱ्यांचे जनावरांसह प्रांत कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.
शिर्डीत अज्ञातांनी माजी खासदार सुजय विखे यांचे बॅनर फाडले. बॅनर फाडल्यानंतर सुजय विखे यांनी विरोधकांना इशारा दिला. शिर्डीमध्ये गुन्हेगारांच्या विरोधात आपण भूमिका घेतली आहे, हे गुन्हेगार फक्त रात्रीतचं हल्ला करू शकतात, मात्र मी अश्या लोकांना हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मराठा समाजा विषयी अपशब्द वापरल्याबद्दल चिपळूण मध्ये मराठा समाज आक्रमक झाला. गुहागरसह चिपळूण मधील शंभरहून अधिक मराठा समाजाचे लोक चिपळूण पोलिस स्टेशनमध्ये धडकले. अपशब्द वापरणाऱ्या तरुणाला हजर करेपर्यंत पोलिस स्टेशनमध्ये थांबण्याची भूमिका मराठा समाजाने घेतल्याने तणाव वाढला आहे.
मराठा आरक्षण संदर्भात मला जीआर दाखवला नाही, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. पक्षाच्या बैठकीसाठी जात आहे. मुख्यमंत्र्याना भेटुन समता परिषदे तर्फे निवेदन देणार आहे. कागद पत्र गोळा करत आहेत आमचे लोक त्यानंतर कोर्टात जाणार आहोत, असे भुजबळांनी स्पष्ट केले.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हफ्ता वितरित झाला. याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जवळपास ९१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ होणार आहे. १८९२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
सोलापूरच्या महिला पोलीस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईची धमकी दिली होती. याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागितल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अजितदादांनी सुद्धा याविषयात स्पष्टीकरण दिल्याचे ते म्हणाले.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स वाढला आहे. आगे आगे देखो होता हैं क्या असे म्हणत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य केलं. खासदार फुटून क्रॉस वोटींग होणार का? या प्रश्नावर फडणवीसांनी असं मोठं विधान केलं.
संगमनेर प्रांतकार्यालयासमोर शिवआर्मी संघटनेचे नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. भाकड जनावरे घेऊन शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला.
जनावरे सांभाळणे जिकिरीचे झाल्याने शेतकरी भाकड जनावरे प्रशासनाच्या ताब्यात देणार . काही दिवसांपूर्वीच प्रांत कार्यालयात सोडली होती जनावरे, आज पुन्हा आंदोलन तीव्र केले. गोवंश हत्या बंदी कायद्यात तातडीने सुधारणा करण्याची मागणी आहे
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचं स्वप्न विरोधकांनी पहात रहावा, आगे आगे देखिये होता है क्या.. – देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला टोला.
नमो शेतकरी योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. – देवेंद्र फडणवीस
बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा यांनी काँग्रेस सह इतर राजकीय पक्षाला धक्का दिला. बडनेरा येथील काँग्रेस पक्षासह इतर अनेक पक्षाच्या शेकडो महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार रवि राणा यांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पार्टीमध्ये पक्ष प्रवेश पार पडला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
नेपाळमध्ये तरूणांच्या आंदोलनाला हिंसक वळण, सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार उफाळला. पंतप्रधानांच्या घरासमोर फायरिंग झाल्याचे वृत्त आहे.
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी, माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत.
सांगली जिल्ह्यातील अकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपींच्या घराजवळ मृतदेह ठेवून तीव्र निदर्शने केली. या घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण अकली गाव बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सांगली ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आणि गावातील तणाव निवळला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
डोंबिवलीतील पलावा परिसरात असलेल्या एका बिर्याणीच्या दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ‘के.जी.एन. बिर्याणी शॉप’ नावाच्या या दुकानात अचानक लागलेल्या या आगीने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मंत्री छगन भुजबळ यांनी निर्णय बदलला. ते लवकरच कॅबिनेट बैठकीला उपस्थिती लावणार आहेत. या बैठकीनंतर समता परिषदेच्या वतीने जीआरबाबत निवदेन दिले जाणार आहे. प्री कॅबिनेटमध्ये छगन भुजबळ हे अजित पवारांची भेट घेणार आहेत.
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वडगावजवळ दगडी कोळसा घेऊन जाणारा एक डंपर उलटला. हा अपघात मुंबईहून पुण्याकडे येत असताना घडला. डंपर चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या एका पिकअपने त्याला धडक दिली. या अपघातात डंपर चालक आणि पिकअप चालक किरकोळ जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले. क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला काढण्यात आली. रस्त्यावर पसरलेला दगडी कोळसा हटवण्यात आला. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, पण आता ती पुन्हा सुरळीत झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामधील कोळवण गावात असलेल्या पोल्ट्री गोडाऊनला मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही पोल्ट्री डॉ. अजय देशपांडे यांच्या मालकीची असून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच पोल्ट्रीतील कामगार संभाजी गुरव यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच पौड पोलिसांनाही तात्काळ घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाऊनमधील खाद्यपदार्थांच्या ४००० रिकाम्या गोण्या, हिशोबाची पुस्तके आणि इतर साहित्य जळून खाक झाले. यामुळे देशपांडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
ट्रकचा कट लागल्याने गॅसचा टँकर पलटी… गॅस टँकरचा चालक जागीच ठार… मृत चालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू… मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीसाठी गेल्या 14 तासापासून बंद… वाहतूक चांदवड–मनमाड–मालेगाव मार्गे वळवली… अपघातग्रस्त स्थळाजवळ जाण्यासाठी संबंधित यंत्रणांशिवाय सर्वांना बंदी…
‘फिनिक्स’ सन्मान स्वीकारताना फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा… काहींना वाटलं माझी राख होतेय, इतक्यात भरारी घेतली… आव्हानांपासून पळालो नाही, टोकाचं राजकारण केलं नाही… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
विशेषतः कावनई व आसपासच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. कावनई येथील कपिलधारा रिसॉर्ट परिसरात दोन बिबटे मस्ती करताना आढळले आहेत. बिबटे धुमाकूळ घालत पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.. बिबट्यांचा मुक्त वावर व मस्ती करतानाचा व्हिडिओ आला समोर. हॉटेल मालक ज्ञानेश्वर सिरसाट तसेच ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने पिंजरे बसवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे
दोन वेगवेगळ्या कारवाईत एक झायलो आणि एक इनोव्हा तस्करी करीत असताना वनविभागाने जप्त केले… दहा लाख रुपयांचे सागवान लाकडे वाहनांसहित जप्त करण्यात आले… गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आसरअली जंगलातून तेलंगणा राज्याला होत होती तस्करी… तेलंगणा राज्यातील शासकीय नोकरीत असलेले कर्मचारी अनेक वेळा या तस्करी प्रकरणासमोर आलेले आहेत
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. बस चालकांनी ड्रायव्हिंग करताना मोबाईल किंवा हेडफोनचा वापर केल्यास तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मराठीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक. सर्व शाळांच्या व्यवहारात मराठी अनिवार्य करण्याची मागणी. आठ दिवसात शाळांवर मराठी फलक लावण्याचे आदेश ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिले.
विशेषतः कावनई व आसपासच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. कावनई येथील कपिलधारा रिसॉर्ट परिसरात दोन बिबटे मस्ती करताना आढळले आहेत. बिबटे धुमाकूळ घालत पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा. समर्थ कॉम्प्लेक्सवर आज पालिकेचा पडणार हातोडा.रहिवाशांचा संताप. सकाळपासूनच इमारतीखाली रहिवाशांची मोठी गर्दी. कामावर न जाता पुढचं काय या चिंतेत नागरिक
कल्याण पश्चिमेतील मधील बिअर शॉपचे रूपांतर थेट ‘बार अँड रेस्टॉरंट’मध्ये करण्यात आलं. शॉपच्या आतच टेबल मांडून बिअर पिण्याची सोय करण्यात आली. लहान मुलांना घेऊन ग्राहकांची उपस्थिती पहायला मिळाली. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नोकरभरती परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. ४९० पदांसाठी तब्बल ५५ हजार उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील २५ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह प्रमुख शहरांत केंद्रे असून एकूण ४२ समन्वयक अधिकारी आणि निरीक्षक काम पाहणार आहेत.
नाशिककरांनी आज धुक्याची चादर अनुभवली आहे. शहरातल्या अनेक भागात सकाळच्या सुमारास दाट धुकं पसरलं होतं. पावसानंतर नाशिकमध्ये अचानक वातावरणात बदल झाला आहे.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय आढावा बैठक पार पडली महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय आढावा बैठक भाजपा प्रदेश महामंत्री तथा आमदार संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व शहरातील विविध महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आजपासून सुनावणी होणार आहे. २२ ऑगस्टला जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आजपासून सुनावणी होणार आहे. पालिकेच्या ३१ प्रभगरचेनेबाबत आलेल्या ९१ हरकती आणि सूचनांवर सुनावणी होणार आहे. प्राप्त हरकतींमध्ये प्रभाग २२ आणि ३१ संदर्भात आत्तापर्यंत सर्वाधिक ३९ तक्रारी आहेत.
पुणे- आयुष कोमकर हत्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्येचा बदला घेण्यासठी ही हत्या केली होती. काल आयुष कोमकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरसह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला होता. हे सगळे आरोपी फरार झाले होते. त्यातील सहा जणांना मध्यरात्री पोलिसांनी राज्य बाहेरून अटक केली आहे.
मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली असून कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल गाड्या दहा ते बारा मिनिटे उशिराने सुरू आहेत. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांनी कल्याण स्थानकावर गर्दी केली आहे. तांत्रिक कारणाने कर्जत आणि कसाऱ्यावरून कल्याणकडे येणाऱ्या लोकल गाड्या उशिराने सुरू आहेत.