
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीची प्रचंड धामधूम सुरू आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडोबा आणि नाराजांना शांत करण्याचा आज दिवसरात्र प्रयत्न होणार आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी मैदानात कोण कोण असणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सभांना सुरुवात होणार आहे. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी सर्वांचं लक्ष मुंबई महापालिकेवर असणार आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय नेत्यांचा भर मुंबईतील प्रचार सभांवर असणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे बंधू पहिल्यांदाच युती करून निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह राज्यातील जनतेला ठाकरे बंधूंची डरकाळी ऐकायला मिळणार आहे. ठाकरे बंधूंच्या सभांना येत्या 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा येत्या 5 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. म्हणजे सोमवारपासून ठाकरे बंधूंची डरकाळी राज्यभर घुमणार आहे. मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता यावी म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. ठाकरे बंधूंनीही एकत्र येऊन मुंबई राखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. प्रसिद्ध राष्ट्रीय कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या भाषेत याचना नही, अब रण होगा… असंच वातावरण मुंबईत दिसणार आहे.
या ठिकाणी सभांचा धडाका…
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह इतर महापालिका क्षेत्रातही होणार आहे. मुंबईत पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्क आदी ठिकाणी ठाकरे बंधूंच्या तीन सभा होणार आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी एकेक सभा होणार आहे.
स्वतंत्र सभाही होणार
नाशिकला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही एक सभा होणार आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या महापालिकांमध्ये स्वतंत्र सभाही होणार आहेत. महापालिका निवडणुकीला अवघे 14 दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच महापालिकांना कव्हर कसं करता येईल, यावर ठाकरे बंधूंचा भर असणार आहे. तसेच मनसे आणि ठाकरे गटातील नेत्यांच्याही सभा होणार आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याही संयुक्त सभा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
उद्धव-राज यांची आज भेट
दरम्यान, उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. दुपारनंतर या दोन्ही बंधूंची भेट होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध होणार आहे. हा वचननामा प्रसिद्ध होण्याच्या आधी दोन बंधूमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती आहे.
उमेदवार भेटीला
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले मनसेचे सर्व उमेदवार 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी येणार आहेत. आमच्या पक्षातल्या काही लोकांनी अपक्ष अर्ज भरले आहेत पण तमाशे केलेले नाहीत. काही जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, असं मनसेकडून सांगण्यात आलंय