
नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सभेत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. तसेच नाशिकरांना शिवसेना मनसेच्या हातात सत्ता द्या आम्ही शहराचा कायापालट करू, हा ठाकरेंचा शब्द आहे. ही बोगस मोदी गॅरंटी नाही’ असं म्हणत भाजपवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘गेल्या दोन वर्षातील ही चौथी सभा आहे. आजच्या सभेत मला आनंद होतोय. माझ्यासोबत माझा भाऊ आणि मनसेचा अध्यक्ष राज आहे. संजयही सोबत आहे. उद्याच्या महापालिकेतील नगरसेवक आहे. ही सर्व जनता तुमच्याकडे अपेक्षेने पाहतेय. त्यांच्या व्यथा संजय आणि राजने मांडल्या. राजने तर त्यांच्याकडे महापालिका असताना काय कामे केली हे अभिमानाने सांगितलं. राजने नाशिक आणि मुंबईत शिवसेनेने कामं केली. काम करणारे दोन भाऊ एकत्र आले तर नाशिकचा काय उत्कर्ष होईल याचा तुम्ही विचार करा.’
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आज बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हुकूमशाही विरोधात रस्त्यावर बंगाल रस्त्यावर उतरला. मग आपण शेपूट घालून बसणार. हा वचनामा आहे. हा छापलेला रंगीत कागद नाही. हा ठाकरेंचा शब्द आहे. ही बोगस मोदी गॅरंटी नाही. ठाकरे जे बोलतात ते करतात. आम्ही कुणाच्या कामाचं श्रेय घेत नाही.
मशाल हृदयात पेटली पाहिजे. यांचा कारभार ज्या पद्धतीने सूरू आहे, तो राहुल नार्वेकर यांचा विधानसभेत अधिकार असतो. अध्यक्ष निष्पपाती वागला पाहिजे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणारा भाजप नार्वेकरांच्या घरात तीन तीन उमेदवारी देता. निवडणूक आयुक्त शेपूट घालून बसला आहे. ही लोकशाही नाही. झुंडशाही आहे. आज उठून उभा राहिलो नाही तर वरवंटा फिरेल. हिंदुत्वाचा बुरखा नसता तर तपोवनाची जागा दिली नसती. इकडे तपोवन कापत आहे. ताडोबात खाणीसाठी जागा देत आहे.
आपल्या भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मुंबईत आम्ही करून दाखवलं. नाशिकची सत्ता हाती द्या. आम्ही सीबीएससी सुरू करू. सत्ता द्या नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालये देऊ. जगातील सर्वात स्वस्त प्रवास देणारी बीएसटी यांना चालवता येत नाही. आमच्याकडे सत्ता द्या. आम्ही नाशिकमध्ये बेस्ट सारखी सुविधा देऊ.’