अरे आमची पोरं कशाला पळवता… त्या मोहन भागवतांचं तरी ऐका… उद्धव ठाकरे यांची खणखणीत टोलेबाजी
नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे, या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली, भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

नाशिकमध्ये आज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची सभा पार पडली, या सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटातील अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, हाच मुद्दा पकडत नाशिकमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी चांगलीच टोलेबाजी केल्याचं पहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी शहर दत्तक घेतलं. ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत ते आमची पोरं पळवत आहेत. त्यामुळे मोहन भागवतांना टाहो फोडावा लागतोय, अपत्य वाढवा. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
भाजपचं हिंदुत्व खरं आहे की चुनावी हिंदुत्व आहे? राम मंदिर केलं म्हणून डंका पिटला. पण राम जिथे तपश्चर्येला बसले होते, तो हा भाग आहे. त्यामुळे तिथली झाडे कापली तर उद्या विचारलं प्रभू राम कुठे राहिले तर काय सांगणार? शासकीय विश्राम गृहात राहिले असं सांगणार का? असा थेट सवालच यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी शहर दत्तक घेतलं. ज्यांना राजकारणात पोरं होत नाही ते आमची पोरं पळवत आहेत. त्यामुळे मोहन भागवतांना टाहो फोडावा लागतोय अपत्य वाढवा. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका. भाजप आज उपटसुंभांचा पक्ष झाला आहे. मला धाकधूक कधीच नव्हती. गेल्यावेळी व्यासपीठावरील माणसं कमी झाली, आज फुल्ल झाले. आमच्याकडे पोरांचा तोटा नाही. माणसं गेली असतील, पण ज्यांनी माणसं मोठी केली ते आमच्यासोबत आहेत. मी भाजपवाल्यांशी आत्मियतेने वागतो, कुत्सित किंवा टोमणा मारत नाही. तुम्ही यांच्या सतरंज्या उचलत आहात. सलिम कुत्ताच्या साथीदारासोबत फोटो, पक्ष वाढवण्यासाठी कुत्ता बिल्ली चालते. अशी माणसं लंगोट साफ करून घेतात. हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता का? असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
आम्ही एकत्र आल्यावर ज्यांनी फटाके फोडले ते आज तिकडे गेले. मला त्यांचं काही नाही निष्ठावान भाजपवाल्यांची चिंता वाटते. ते आले म्हणून देवयानी ताईंना रडू आलं. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. ताई तुम्ही जो पक्ष पाहत आहात तो उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. हे माझं नाही देवयानी ताईंचं वाक्य आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले शनि शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाही. शिंगणापूरला संकटग्रस्त जातात. भाजपमध्ये ईडी सीबीआय मागे लागलेले येत आहे. उद्या रावणालाही भाजपमध्ये घेतील. इतके हे निर्लज्ज आहेत, अशी टीका यावेळी ठाकरे यांनी नाशिकमध्ये बोलताना केली.
