पाकिस्तानसोबत चर्चेची तयारी, मग वांगचुक यांच्यासोबत का नाही? उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला खणखणीत सवाल
दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मोठे आंदोलन केले.

Uddhav Thackeray Protest : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. वांगचूक यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असले तरीही त्यांचे आंदोलन सुरूच आहे. दुसरीकडे दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मोठे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी सोनम वांगचूक यांच्या लढ्याला पाठिंबा देत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी आहे. पण सोनम वांगचूक यांच्याशी चर्चा करायला सरकारला वेळ नाही, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.
सरसंघचालक भागवतांना विचारलं तर…
मुंबईच्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना मी नागपुरात होतो. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र आहे. कालच्या मे महिन्यात संघातील होसबळे यांनी एक विधान केलं. पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे, असं ते म्हणाले. जो पाकिस्तान भारतात आतंकवादी घुसवतो. हल्ले करतो, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजे, असं त्यांचं मत आहे. सरसंघचालक भागवतांना विचारलं तर म्हणतात की बरोबर आहे. पाकिस्तानसोबत चर्चेची तयारी आहे. मग वांगचुकसोबत चर्चा का नाही करत? असा रोखठोक सवाल ठाकरे यांनी केला.
आंदोलनात एवढा फौजफाटा का आणताय?
तसेच, जो देश सैनिकांचे बळी घेतो त्याच्याशी चर्चा करायची तयारी आहे आणि जो माणूस सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतो त्याच्याशी चर्चा नाही. अशी माणसं मिळत नाहीत, असं म्हणत दिल्लीच्या आंदोलनात एवढा फौजफाटा का आणताय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
केंद्रातील सरकार घालवले पाहिजे
दरम्यान, आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सरकार बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अस आवाहन केले. तसेच या सरकारला घालवण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करावा लागेल, असे मत करत सर्वांनी एकत्र येऊन मोदी सरकारविरोधात एकजूट झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.