ठाकरे बंधूंच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, शिंदे गटाला भरली धडकी, उचललं मोठं पाऊल
उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी 'मातोश्री' ला भेट दिली. या भेटीने राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा जोर धरली आहे. हिंदी लादण्याच्या विरोधात दोघेही एकत्र असून, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती शिंदे गटासाठी धोकादायक ठरू शकते.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारी २७ जुलै रोजी ६५ वा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला. त्यासोबतच वाढदिवसानिमित्त सदिच्छाही दिल्या. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व शिवसेना नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई देखील होते. या कौटुंबिक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली आहे. ज्यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत होणारे पक्षप्रवेश थांबले
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाला धडकी भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत होणारे पक्षप्रवेश थांबले असल्याची चर्चा आहे. विशेषतः मुंबईतील माजी नगरसेवकांचे शिंदे गटातील प्रवेश थांबले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य जवळीकतेमुळे आणि युतीच्या चर्चेमुळेच हे पक्षप्रवेश थांबल्याचे बोलले जात आहे. दर आठ-पंधरा दिवसांनी होणारे प्रवेश अचानक थांबल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
सध्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. हा मुद्दा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आशा निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
त्यातच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. जर या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केली, तर त्याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बसू शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. सध्याच्या परिस्थितीत, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने ठाकरे बंधूंना बेरजेच्या राजकारणाचा फायदा होईल. विशेषतः मुंबईत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक मोठे बदल अपेक्षित आहेत.
मराठवाड्याच्या राजकारणात मोठी घडामोड
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरु आहे. ज्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप जोरदार मुसंडी मारत आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि तीन वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्याल, तसेच ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर हे आज मंगळवारी २९ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मुंबईत पक्षप्रवेश करणार आहेत.
हे सर्वजण रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील. या पक्षप्रवेशांमुळे नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून, मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या राजकारणात ही एक मोठी घडामोड मानली जात आहे, कारण यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
