‘हिंमत असेल तर हे करून दाखवाच…’, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांंना ओपन चॅलेंज
आज मुंबईमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे, या कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

मुंबईमध्ये आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. हिंमत असेल तर हिंदीची सक्ती करूनच दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यात येणार आहे, यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘या देशाची या लोकांनी वाट लावली. आता शिवसेना संपवण्याची वाट पाहत आहेत. अरे तुम्ही कितीही स्वप्न पाहा शिवसेना तुमच्या भ्रष्टाचाराला संपवून तुमच्या छाताडावर नाही भगवा रोवला तर नाव नाही सांगणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला भांडून चालणार नाही. भाजपची जी नीती आहे, त्यांनी विधानसभेत नारा दिला होता. बटेंगे ते कटेंगे. आपल्याला वाटलं हिंदू मुसलमान, आता मुंबईत हिंदू हिंदूत मारामाऱ्या लावायच्या, हिंदी सक्तीची करायची, हिंदी सक्तीची झाली की ९२-९३ ला ज्या लोकांना वाचवलं होतं, त्यांनाच आपल्यापासून तोडायचं.
हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही. करायची असेल हिंमत तर देवेंद्र तुम्ही करून दाखवाच . हिंदीचं आमचं वैर नाही, पण सक्ती कशासाठी? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन पाहा, काय करतात ते. हिंदीची सक्ती गुजरातमध्ये केली नाही, आधी गुजरातमध्ये हिंदी सक्तीची करा. इथे आपल्याला भांडत ठेवायचं, निवडणुकीच्या तोंडावर आपण एकत्र राहतो. मराठी अमराठीत भांडण लावायची, मग हे भष्ट्राचार करायला मोकळे असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरून देखील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
