उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहा:कार, महाराष्ट्रातल्या त्या 11 पर्यटकांचं काय ?
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या भीषण ढगफुटीमुळे मोठा पूर आला आहे. यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जखमी आहेत. नांदेड जिल्ह्यातील ११ भाविक केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेसाठी गेले असताना अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने मदत करण्याचे आवाहन केले आहे.

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये काल दुपारी प्रचंड मोठी ढगफुटी झाली. धराली येथे या ढगफुटी झाल्यानंतरमोठा पूर आला असून गावात आणि आसपासच्या परिसरात अक्षरश: विध्वंस झाला आहे. या दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत, काही बेपत्ता आहे. ढगफुटी, पाऊस, पाणी यामुळे गावाचंही मोठं नुकसान झालं असून दुर्घटनेचे व्हिडीओही समोर आले आहेत. काळीज पिळवटून टाकणारं दृश्य पाहून अनेकांची मन हेलावली आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातील काही पर्यटकही तिकडे गेले असून सध्या ते तिथेच अडकल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड येथून दर्शनासाठी बद्रीनाथ, केदारनाथ येथे गेलेले 11 भाविक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वच भाविक नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी आहेत. नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन, तसेच पालकमंत्री अतुल सावे यांनी भाविकांशी संपर्क साधून विचारपूस केली आहे. सदरील भाविक हे उत्तरकाशी येथील धराली येथून 150 किमी अंतरावर आहेत. एका जागी सात भाविक आणि दुसऱ्या ठिकाणी चार भाविक अडकले आहेत असेही समजते.
अडकलेल्या 11 भाविकांची नावे :
1. सचिन पत्तेवार (वय 25)
2. शिवचंद्र सुकाळे (वय 30)
3. शिवा कुरे (वय 32)
4. स्वप्निल पत्तेवार (वय 25)
5. शिवा ढोबळे (वय 28)
6. धनंजय ढोबळे (वय 26)
7. नागनाथ मुंके (वय 28)
8. देवानंद गौण्डगे वय 24
9. अमोल कुरे (वय 28)
10. सोमनाथ चंदापुरे (वय 29)
11. देवानंद चंदापुरे (वय 27)
उत्तरकाशी जिल्ह्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौ. डोणगाव येथील 11 भाविक केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी 01 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड येथून निघाले होते. त्यांचा संपर्क झाला असून, ते सर्व सद्यस्थितीत घटनास्थळापासून 150 किमी दूर असून, सर्वजण सुखरूप असल्याचं जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास सचिन पत्तेवार यांनी कळवलं आहे.
या क्रमांकावर करा संपर्क
नांदेड जिल्ह्यातील इतर कोणी उत्तराखंड येथे अडकून पडले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदाराकडे किंवा जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.
अडकलेल्या पर्यटकांनी काय सांगितलं ?
आम्ही घटनास्थळाजवळ असून , इथे तूफान पाऊस सुरू आहे. नद्यांना प्रचंड पूर आला आहे, त्यामुळे अनेक रस्ते बंद आहेत. आमच्या ग्रुपमधले 7 जण इतर ठिकाणी अडकले आहेत आणि आम्ही तिघे दुसऱ्या लोकशेनवर आहोत. कृपया कोणी इथे यायचा विचार करत असेल तर सध्या इथे येणं टाळावं असं आवाहन पर्यटकाने केलं आहे.
