आम्ही वैष्णवीचे चारित्र्यहनन करत नाही, ‘त्या’ खळबळजनक दाव्यानंतर हगवणेंच्या वकिलाचे स्पष्टीकरण!
वैष्णवी हगवणे एका अन्य मुलाशी बोलत होती. त्या मुलाचा 18 तारखेलाच साखरपुडा झाला होता, यातूनच वैष्णवीने आत्महत्या केली असावी, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केला आहे.

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. हगवणे कुटंबाने तिचा अतोनात छळ केल्याचा आरोप करण्यात येतोय. वैष्णवीने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून केलेला आहे, असा दावा वैष्णीच्या माहेरच्या मंडळींनी केलेला आहे. असे असतानाच आता हे प्रकरण न्यायालयापुढे आल्यानंतर हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. वैष्णवी एका अन्य व्यक्तीला चॅटिंगवर बोलत होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा खळबळजनक दावा हगवणे कुटुंबाचे वकील अॅड. विपुल दुसिंग यांनी केलाय. तसेच आम्ही वैष्णवीच्या चारित्र्याचे हनन आम्ही केलेले नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.
तिने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
हगवणे कुटुंबीय सध्या पोलीस कोठडीत आहे. आज वैष्णवीच्या आत्महत्येच्या खटल्यात न्यायालयापुढे सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडली. न्यायालयापुढे बाजू मांडताना हगवणे कुटुंबाचे वकील अॅड. विपुल दुसिंग वैष्णवी एका अन्य व्यक्तीशी चॅटवर बोलत होती, असा खळबळजनक युक्तिवाद केला. तसेच वैष्णवीचा स्वभाव हा आत्महत्या करण्याचाच होता. तिने याआधीही दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा दावा अॅड. विपुल दुसिंग यांनी न्यायालयात केला. सरकारी वकिलांनी मात्र हे सर्व दावे फेटाळून लावत वैष्णवीच्या आत्महत्येस हगवणे कुटुंबच जबाबदार आहे, असं ठणकावून सांगितलं. आजची सुनावणी संपल्यानंतर अॅड. विपुल दुसिंग यांनी न्यायालयाबाहेर न्यायालयात काय-काय घडलं याची सविस्तर माहिती दिली आणि आम्ही वैष्णवीच्या चारित्र्याचे हनन केलेले नाही, असंही स्पष्ट केलं.
अॅड. विपुल दुसिंग नेमकं काय म्हणाले?
आम्ही वैष्णवी हगवणे यांचे चारित्र्यहनन केलेलं नाही. वैष्णवी एका वेगळ्या व्यक्तीशी चॅट करत होती. त्या व्यक्तीचे आणि वैष्णवीचे भांडण झाले. त्यातूनच तिने आत्महत्या केली आहे, असा खळबळजनक दावाच अॅड. विपुल दुसिंग यांनी केला. तसेच त्या व्यक्तीचे नाव मी मीडियासमोर सांगू इच्छित नाही. हगवणे कुटुंबियांनी यासंदर्भात वैष्णवीच्या आई-वडिलांना वेळोवेळी माहिती दिली होती, असंही पुढे दुसिंग यांनी सांगितले.
मुलाचा 18 तारखेला साखरपुडा होता
त्या मुलाचा 18 तारखेला साखरुपडा झाला होता. त्यासाठी वैष्णवी त्याला कॉल करत होती. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. तिचे चॅट हगवणे कुटुंबाने पाहिले होते. त्या मुलाने नकार दिला असेल, म्हणून तिने आत्महत्येचा केली असेल, असा अंदाज न्यायालयात दुसिंग यांनी व्यक्त केला. तसेच प्लास्टिकच्या छडीला शस्त्र म्हणावे का? वैष्णवीच्या अंगावर जखमा कशामुळे झाल्यात हा तपासाचा भाग असल्याची भूमिका त्यांनी मांडली. आम्ही हे पहिल्या दिवसापासून सांगत होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
