अचानक विहिरीतून यायला लागलं गरम पाणी, अकोल्यात भीतीचे वातावरण; नेमकं काय घडलं?

Warm Water in Well : पातूर तालुक्यातील आलेगाव येथील अरुण मूर्तडकर यांच्या मालकीच्या विहिरीतील पाणी गेल्या तीन दिवसांपासून सतत उबदार लागत असल्याचे सांगितले जात आहे. आता या पाण्याची तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अचानक विहिरीतून यायला लागलं गरम पाणी, अकोल्यात भीतीचे वातावरण; नेमकं काय घडलं?
warm water found in well akola
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 18, 2026 | 4:29 PM

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका खासगी विहिरीतील पाणी सलग तीन दिवसांपासून स्पर्शाला उबदार लागत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही शासकीय यंत्रणेने अधिकृत खुलासा केलेला नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अकोल्यातील विहिरीला गरम पाणी

समोर आलेल्या माहितीनुसार, पातूर तालुक्यातील आलेगाव येथील अरुण मूर्तडकर यांच्या मालकीच्या विहिरीतील पाणी गेल्या तीन दिवसांपासून सतत उबदार लागत असल्याचे सांगितले जात आहे. ही विहीर पिण्याच्या आणि घरगुती वापरासाठी नियमित वापरली जाते. विशेष म्हणजे विहिरीतील मोठ्या प्रमाणात पाणी उपसल्यानंतर झऱ्यातून पुन्हा भरून आलेले पाणीही उबदारच असल्याचा दावा विहीर मालकाने केला आहे. ही माहिती गावात पसरताच अनेक नागरिकांनी विहिरीवर धाव घेत प्रत्यक्ष पाण्याची पाहणी केली आहे.

या प्रकरणाची तपासणी करण्याची मागणी

या अनोख्या घटनेमुळे ग्रामस्थांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए) आणि आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन विहिरीतील पाण्याचे तापमान, गुणवत्ता आणि भूगर्भीय कारणांची शास्त्रीय तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहातील बदल किंवा स्थानिक भूगर्भीय रचनेमुळे अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यामागील नेमके कारण शास्त्रीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

गरण पाणी येण्याची संभाव्य कारणे काय?

विहिरीतून गरम पाणी येण्याचे मुख्य कारण म्हणजे भूगर्भातील उष्णता हे असू शकते. पावसाचे किंवा जमिनीवरील पाणी जसे जसे खोलवर जाते, तशी पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक उष्णता वाढते. त्यामुळे या पाण्याच्या तापमानात वाढ होते. भूकंपाच्या पट्ट्यात किंवा ज्वालामुखीय क्षेत्रात ही उष्णता जास्त असते. त्यामुळे अशा भागातील पाणी हे गरम असू शकते.

महत्त्वाची बाब म्हणजे काही भागात जमिनीखाली वितळलेल्या खडकांचा थर असतो. या थराच्या संपर्कात येणारे भूजल गरम होते आणि ते विहिरीत असणाऱ्या झऱ्यांमधून बाहेर येते. तसेच काही वेळा पाण्यात विविध खनिजे आणि गंधक मिसळतात. या नैसर्गिक रासायनिक प्रक्रियेमुळे सुद्धा पाण्याचे तापमान वाढू शकते.

Follow Us