मातीचा ढिगारा उपसताना ते पाहिलं अन् जेसीबी थांबवला, जे सापडलं ते पाहून बोबडीच वळाली, नेमकं काय घडलं?

महामार्गाचे काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली नेमकं असं काय सापडलं की ज्यामुळे काम थांबवावं लागलं? प्रत्यक्षदर्शींच्याही पायाखालची जमीन सरकली. या धक्कादायक घटनेचा संपूर्ण थरार सविस्तर वाचा.

मातीचा ढिगारा उपसताना ते पाहिलं अन् जेसीबी थांबवला, जे सापडलं ते पाहून बोबडीच वळाली, नेमकं काय घडलं?
Washim Highway
| Updated on: Mar 18, 2026 | 8:50 AM

वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला-नांदेड या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, बुधवारी रात्री हिंगोली नाका परिसरात सुरू असलेल्या या कामादरम्यान एका अज्ञात व्यक्तीचे मानवी अवशेष सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधारात उघडकीस आलेल्या या घटनेने पोलीस प्रशासनासमोर तपासाचे मोठे आव्हान उभे केले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली नाका परिसरात रस्ता मजबुतीकरणासाठी मुरुमाचे ढिगारे टाकण्यात आले होते. रात्री १०.३० च्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने हे ढिगारे पसरवण्याचे काम वेगात सुरू होते. यावेळी मुरुमाच्या एका ढिगाऱ्याखाली काहीतरी वेगळे असल्याचे जेसीबी चालकाच्या निदर्शनास आले. त्याने अधिक जवळून पाहिल्यावर ते मानवी शरीराचे मृतदेहाचे काही अवशेष असल्याचे स्पष्ट झाले.

हे दृश्य पाहताच चालकाला धक्का बसला. त्याने तात्काळ काम थांबवले. यानंतर त्याने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करत पोलिसांना बोलवले. अवघ्या काही मिनिटांतच वाशिम शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचे गांभीर्य ओळखून वाशिम शहर पोलीस, वाशिम ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून पंचनामा सुरू केला आहे.

सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. हा मृतदेह किंवा त्याचे अवशेष मुरुमाच्या वाहतुकीतून आले आहेत का? हा मुरूम नेमका कुठल्या खदानीतून किंवा ठिकाणाहून आणला गेला, याचा शोध पोलीस घेत आहेत. कुणीतरी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मुरुमाखाली दाबून ठेवला होता का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

सध्या हे सापडलेले अवशेष पूर्ण शरीराचे आहेत की केवळ काही भागांचे, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मात्र महामार्गाच्या कामावर अशा प्रकारे मृतदेह सापडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा अपघात आहे की सुनियोजित घातपात याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे.

Follow Us