आम्ही तिघे भेटलो हीच… उद्धव ठाकरे-संजय राऊत यांच्यासोबत प्रवास करताना CM फडणवीसांचे मोठे विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि इतर काही नेते आज एकत्र मुंबई ते नागपूर असा प्रवास करत आहेत. यावर फडणवीस यांनी विधान केले आहे.

आम्ही तिघे भेटलो हीच... उद्धव ठाकरे-संजय राऊत यांच्यासोबत प्रवास करताना CM फडणवीसांचे मोठे विधान
Fadnavis Thackeray Together
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 26, 2026 | 7:28 PM

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि इतर काही नेते आज एकत्र मुंबई ते नागपूर असा प्रवास करत आहेत. खासकरून फडणवीस, राऊत आणि ठाकरे हे एकाच विमानातून प्रवास करत असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. अशातच आता या प्रवासावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही तिघे भेटलो हीच मोठी बातमी असल्याचे विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकत्र विमान प्रवास

राज्यात गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण अस्थिर आहे, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यावरून ठाकरे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका करत आहेत. याच दरम्यान या दोन्ही बड्या नेत्यांनी सोबत विमान प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. काही लोक यावरून वेगवेगळे तर्क वितर्क काढताना पहायला मिळत आहेत.

एकमेकांची केली विचारपूस

समोर आलेल्या माहितीनुसार, या नेत्यांनी मुंबई ते नागपूर असा प्रवास सोबत केला. विमानात प्रवेश करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी हस्तादोंलन केलं, तसेच दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस देखील केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे इतर नेते देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करण्यासाठी विदर्भात जाताना या दोन नेत्यांची भेट झाली आहे.

दरम्यान, दोन्ही बड्या नेत्यांच्या या विमानप्रवासावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाष्य केले आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह इतरही नेत्यांनी हा केवळ योगायोग असल्याचे म्हटले आहे. तसेच दोन्ही नेते आपापल्या कामासाठी जात होते, या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असंही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us