अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांची बॉडी लँग्वेज काय सांगते? राजकीय विश्लेषकांचा मोठा अंदाज

विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं आहे, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? नवा उपमुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यावर राजकीय विश्लेषकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांची बॉडी लँग्वेज काय सांगते? राजकीय विश्लेषकांचा मोठा अंदाज
ncp
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 29, 2026 | 6:28 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, अजित पवार यांचं विमान मुंबईहून बारामतीला निघालं होतं, धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला. आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काय होणार? दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का?  उपमुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू झाली आहे, यावर आता राजकीय विश्लेषकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. जाणून घेऊयात ते नेमकं काय म्हणाले आहेत?

‘मला असं वाटतं की आता काही तासांपूर्वीच अजितदादा यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात आले आहेत,  त्यामुळे ही जी राजकीय समीकरणे आहेत, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल पण एक नक्की आहे की राष्ट्रवादीच्या वाट्याचे उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीलाच दिलं जाणार आहे. प्रश्न असा आहे की जे राज्यसभेत किंवा लोकसभेत आहेत त्यांना राज्याच्या राजकारणात आणून उपमुख्यमंत्रिपद द्यायचं की राज्याच्या राजकारणात जे आहे त्यांना द्यायचं, छगन भुजबळ यांच्या सारखे ज्येष्ठ नेते इथे आहेत.

ही इतकी अचानक घडलेली घटना आहे की ती कोणाच्या कल्पनेत सुद्धा नव्हती, अपघात होऊन अजित पवारांसारखा तरुण नेता या अपघातात जाईल हे कोणालाही वाटत नव्हतं, हा धक्का कमी झाल्यानंतर  या संदर्भात नक्की यावर चर्चा होईल, की केंद्राच्या राजकारणात असलेल्या सुनील तटकरे किंवा सुनेत्रा पवार यांना ते उपमुख्यमंत्रिपद द्यायचं की राज्यातल्या राजकारणात ते पद द्यायचं यावर निर्णय होईल.

राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे आता औपचारिकता राहिली आहे, तसा निर्णय महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच झालेला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिका त्यांनी एकत्र लढवल्या होत्या, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामध्ये फारसं काही राहिलं नाही, कारण कार्यकर्ते आणि नेत्यांनी ते स्वीकारलं आहे. कारण यात आपलं नुकसान होतं हे त्यांना दिसून येत आहे, कारण विधानसभेच्या वेळेस शरद पवारांचं नुकसान झालं, महानगरपालिकेत अजितदादांचं नुकसान झालं, त्यामुळे हे सगळं बघता ते एकत्र येतील. गेल्या काही दिवसात अजितदादा स्वतः जाहीरपणे बोलत होते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हे ऐक्य होणे हे अजितदादांना सुद्धा आदरांजली आणि श्रद्धांजली ठरेल, असं माने यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना माने म्हणाले की, हा खरंतर गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अजितदादा सारखा लीडर नसताना त्यांचा राष्ट्रवादी सारखा पक्ष भाजप, महायुती आणि संघ विचाराचा दबाव कशापद्धतीने हाताळतो. दुसऱ्या बाजूला अजितदादा जाहीरपणे सांगायचे की मी शिव शाहू फुले यांचा विचार पुढे घेऊन जाणारा आहे. अजितदादा महायुतीत सहभागी झाले तरी ते संघाच्या बैठकीत गेले नाहीत, मोठं प्रेशर असताना सुद्धा त्यांनी नवाब मलिक यांना सोडलं नाही, नवाब मलिकांकडे भाजपच्या नाकावर टिचून मुंबईतील सूत्र दिली होती, या प्रकारचा सेक्युलर विचार आणि त्यांनी जपलेली आपली सेक्युलर प्रतिमा होती, त्यामुळे अजितदादा गेल्यावर ही प्रतिमा जपली जाईल का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.

शरद पवारांची जी विचारधारा आहे ती विचारधारा अजितदादा पुढे घेऊन जात असताना आणि दोन्ही पक्ष एकत्र येत असताना शरद पवारांचं मत काय? हे सुद्धा जाणून घेणे तेवढंच महत्त्वाच आहे. सोबतच अजितदादांच्या गटातील लोक त्याला कसं रिऍक्ट करतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण सत्ता विचारधारेसाठी सोडायची आहे का? किंवा मग शरद पवार गटाला सत्तेसाठी विचारधारा सोडायची आहे का? हे प्रश्न सुद्धा समोर येऊ शकतात. त्यामुळे हा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर त्या कुठल्या आयडालॉजीवर येत असतील? ते जर फुले शाहू आंबेडकर विचारांची विचारधारा घेऊन चालणार असतील तर ते मग सत्तेत सहभागी होणार का? असाही प्रश्न येतो, सत्ता आणि विचारधारा याचा पेच त्यांना सोडवायचा आहे.

ज्या पद्धतीने काल शरद पवार यांना हतबल झालेलं पाहिलं, सुप्रिया सुळे यांची बॉडी लँग्वेज आपण बघितली, राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांची बॉडी लँग्वेज आपण बघितली तर या दुःखद घटनेच्या आणि अपघाताच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत, आता ती फक्त औपचारिकता बाकी आहे, असं दिसून येतं. कदाचित त्याची सुरुवात 12 जिल्हा परिषद  निवडणुकांच्या धामधुमीनंतर आपल्याला पाहायला मिळू शकते, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर राजकारणात काय बदल होतो? ते पहाणं महत्त्वाचं असणार आहे.