
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिकामे झाले आहे. त्यामुळे आता हे पद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री बनवले जाते अशी मागणी होत आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ‘दादांच्या अकाली जाण्याचा धक्क्यातून आम्ही कोणीच सावरलेलं नाही. दादा आमच्यातच आहे असं वाटतं. या शोकमग्न अवस्थेत आम्ही आहोत. आज त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणं माझ्यासाठी क्लेशकारक आहे. ज्या कार्यालयात पक्षाचं संघटन उभं केलं, तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याच्या भावनेतून मी इथे आलो होतो.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलताना सनील तटकरे म्हणाले की, ‘आज मुख्यमंत्र्यांशी भेट जरूर झाली. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब धार्मिक विधीत आहे. त्यानंतर आम्ही कुटुंबाशी संपर्क करू. जनतेच्या मनातील मत, आमदारांच्या मनातील मत या सर्वांवर बोलू. सुनेत्रा वहिनींशी बोलणंही महत्त्वाचं आहे. दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला. त्यांच्या दुखद निधनाने राज्य शोकमग्न आहे. त्याच शोकाकूल वातावरणात आम्ही आहोत. बाकीच्या विषयावर चर्चा नाही.’ दरम्यान, या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री कोण हे ठरण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत तातडीने बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा, नेतृत्वाची जबाबदारी आणि विशेषतः उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. उद्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाबाबत एकमुखी निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.