
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. बच्चू कडू यांचं उपोष सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात येईल, या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता सर्वाचं लक्ष या समितीची स्थापना कधी होणार याकडे लागलं आहे? यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात या समितीची घोषणा करू, मुख्यमंत्र्यासोबत कालच चर्चा झाली आहे, आमची समिती तयार होत आहे. अधिवेशन काळात ती घोषित करू, येत्या तीन जुलैला यासंदर्भात चार वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक होणार आहे. माझ्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आठ ते दहा मंत्री देखील सहभागी होणार आहेत. धन दांडग्याना कर्जमाफी नको, ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी, अशी आमची भूमिका असल्याचं देखील यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन
दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून सातत्यानं सुरू आहे, त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होता, आंदोलनाच्या सहाव्या दिवशी अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती, त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावाला होता.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात बोलताना म्हटलं होतं की आम्ही लवकरच त्यासाठी एका समितीची स्थापना करू, या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ, त्यामुळे आता ही समिती कधी स्थापन होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे, या संदर्भात आता बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.