पक्षांतराला जबाबदार कोण? ज्येष्ठ विधीतज्ज्ञाचा रोख कुणाकडे? थेट कोर्टालाच…

Ulhas Bapat : शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सर्वोच्च न्यायालयावरच निशाणा साधला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

पक्षांतराला जबाबदार कोण? ज्येष्ठ विधीतज्ज्ञाचा रोख कुणाकडे? थेट कोर्टालाच...
Ullahs Bapat On Shivsena UBT
Image Credit source: Google
| Updated on: Jun 17, 2026 | 3:44 PM

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहे. या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. खासदार संजय राऊत यांनी आर्थिक प्रलोभनांमुळे खासदार फुटले असल्याचा आरोप करत या खासदारांचा बदला घेणार असल्याचे विधान केले आहे. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य करत या प्रकरणाला सुप्रीम कोर्टाला जबाबदार धरले आहे. बापट यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले उल्हास बापट?

उल्हास बापट यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना बापट यांनी म्हटले की, दोन तृतियांश खासदार बाहेर पडले तर त्यांची खासदारकी वाचते. पण मूळ राजकीय पक्षाने मर्ज व्हायचा निर्णय घेतला तर त्याला त्या पक्षाच्या दोन तृतियांश आमदार आणि खासदारांनी मान्यता द्यायला हवी. या प्रकरणात उद्धव ठाकरे काहीच बोललेले नाहीत. 6 लोक बाहेर चालले आहेत. आता हे बरोबर आहे हे सुप्रीम कोर्टाने ठरवायला हवं.

सर्वोच्च न्यायालयावर निशाणा

पुढे बोलताना बापट यांनी म्हटले की, भीती दाखवायची, विकत घ्यायची मंत्रिपद द्यायचं या सगळ्या प्रलोभनांमुळे पक्षांतर होत आहेत. याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देणं आवश्यक आहे, मात्र कोर्ट निर्णय देत नाही. त्यामुळे मला असं वाटत की भारताच्या लोकशाहीचे जे पतन चालू आहे याला सर्वात जास्त जबाबदार राजकारणी लोकं तर आहेतच, सर्वोच्च न्यायालय आहे, ज्याच्यावर आपण विश्वास टाकलेला आहे. सुप्रीम कोर्टाने यावर स्वच्छ शब्दात निर्णय द्यायला पाहिजे, जो कोर्टाने अजून दिलेला नाही. गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्णयावरही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर बंदी कायद्याचा शेवटचा अर्थ लावणे आवश्यक आहे.

कोणते खासदार फुटले?

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील, वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us