ठाकरे गटाचे खासदार नाराज का? उद्धव ठाकरेंची ही गोष्ट खटकली… सूत्रांकडून सर्वात मोठी अपडेट
Shiv Sena UBT MP : शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे खासदार नाराज का आहेत याबाबत सूत्रांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे.

राज्याच्या राजकारणातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, यात उद्धव ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठकीही बोलावली होती. या बैठकीली काही खासदार प्रत्यक्ष तर काही ऑनलाईन पद्धतीने हजर होते. मात्र आज ठाकरेंचे खासदार फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून काही खासदार वेगळा गट स्थापन करू शकतात, असे सांगितले जात आहे. आता उद्धव ठाकरेंचे खासदार का नाराज आहेत याचे कारणही समोर आले आहे.
ठाकरेंचे खासदार या कारणामुळे नाराज
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे काही खासदार पक्षातून बाहेर पडण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्यावर ते 2-4 तास ताटकळत ठेवतात, अशी नाराज खासदारांनी तक्रार केली आहे. याआधी 4 वर्षांपूर्वीही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अनेक नाराज आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करण्याचा निर्णय घेतला होत. आता पुन्हा एकदा असाच झटका ठाकरेंना बसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
वेगळा गट स्थापन करणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदारांना भेटत नाहीत, या खासदारांना मदत केली जात नाही. खासदार भेटायला गेल्यास त्यांची भेट न घेता उद्धव ठाकरे विरोधी नेत्यांना भेटत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. शाखा स्तरावरही खच्चीकरण केले जात आहे, त्यामुळे वाळीत टाकण्याची भावना या खासदारांच्या मनात निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र आता नाराज खासदार वेगळा गट स्थापन करणार का याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंचे काही खासदार हे लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचे काही खासदार हे दिल्लीमध्ये शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले आहेत. त्यामुळे लवकरच हे खासदार नवा गट स्थापन करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या दिल्लीत घडत असलेल्या घडामोडी लक्षात घेता ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत. डॅमेज कंट्रोलची जबाबदारी आता राऊत यांच्यावर देण्यात आली असल्याचे समोर आले आहे.