पुणे हादरलं, पत्नीची दृश्यम स्टाईल हत्या, मृतदेह जाळून राख ओढ्यात फेकली
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, पतीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला, त्यानंतर त्याने ती राख ओढ्यात फेकली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. पत्नीच्या कथित प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर मृतदेह जाळून त्याची राख ओढ्यात फेकून दिली आहे, पुण्यातील या दृश्यम स्टाईल हत्येच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. हे दोघे पती-पत्नी घटनेपूर्वी जिथे भेळ खाण्यासाठी गेले होते, त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी पती त्याच्या पत्नीला घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. आरोपीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली, त्यानंतर पुरावे नष्ट केले आणि स्वत; च पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती.
मात्र पोलिसांना या प्रकरणात सुरुवातीपासून त्याच्यावरच संशय होता, त्याआधारे शोध घेऊन, पुरावे गोळा करून वारजे पोलिसांनी हे थरकाप उडवणारं हत्याकांड समोर आणलं आहे. समीर पंजाबराव जाधव असे या आरोपीचे नाव आहे, तर अंजली समीर जाधव (वय ३८) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
पत्नीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीला होता, तो सतत तिचा मोबाईल चेक करायचा, त्यातून पत्नी-पत्नीमध्ये भांडणं व्हायचे. अखेर त्यानंतर आरोपीने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्याने शिंदेवाडी येथे 18 हजार रुपये भाड्याने एक गोदाम घेतले, या गोदाममध्ये त्याने आधीच लोखंडी भट्टी तयार करून ठेवली, तिथे लाकडं देखील आणून ठेवले. त्यानंतर आरोपीने २६ ऑक्टोबर रोजी आपली पत्नी अंजलीला कारमध्ये फिरायला नेले. नवले ब्रिजमार्गे खेडशिवापूर, मरीआई घाट परिसरात फिरवल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदेवाडी येथे थांबून भेळ खाण्याचा बहाणा केला, त्यानंतर गोडाऊनमध्ये चटईवर बसून दोघे भेळ खात असताना त्याने अचानक तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह लोखंडी बॉक्समध्ये टाकून पेट्रोल ओतून जाळला. आणि राख ओढ्यात टाकून दिली, तसेच तो लोखंडी बॉक्स देखील भंगारामध्ये विकला आहे.
