
ATS Action in Maharashtra: एटीएसने राज्यभरात मोठी कारवाई केली आहे. यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसने छापे टाकले आहेत. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसचे सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. जवळपास २१ ठिकाणी एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईत अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान या कारवाईने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुकुंदनगरमध्ये छापेमारी
अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएसने छापेमारी केली. मध्यरात्री एटीएसने ही छापेमारी केली. गोपनीय पद्धतीने मुकुंदनगरमधील नागरिकांची चौकशी करण्यात आली. मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखल्या जातो. गेल्या दोन ते तीन वर्षात औरंगजेबाचं उद्दातीकरणाचा प्रयत्न असो वा पाकिस्तानच्या घोषणा असो अहिल्यानगर हे चर्चेत आले आहे. यापूर्वी अहिल्यानगरमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या तरुणांची माथी भडकवण्याचे प्रयत्न पण समोर आले होते. त्यानंतर आता एटीएसच्या छापेमारीने पुन्हा एकदा हा भाग चर्चेत आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एटीएसचे 20 पथक दाखल
दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची 20 पथक दाखल झाले आहेत. एटीएसकडून उमरखेड, पुसदमध्ये संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईत वरिष्ठ आयपीएस अधिकारी ही सहभागी झाले आहेत. राज्यात एटीएएसने रात्रभर गोपनीय कारवाई केली. उमरखेड आणि पुसदमध्ये एटीएसचे 20 पथक तळ ठोकून आहेत. रात्री त्यांनी अनेकांची चौकशी केली. तर काही तरुणांना, संशयितांना ताब्यात घेतले आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात रात्रभर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अत्यंत गोपनिय पद्धतीने करण्यात आली. रात्री अनेकांची चौकशी करण्यात आली.
संशयितांची कसून चौकशी
विदर्भातील चार ते पाच ठिकाणी आणि अहिल्यानगरमध्ये एटीएसने दहशतवादी कारवायासंदर्भात संपर्कात असलेल्या काही संशयितांच कसून चौकशी केली. रात्री संशयितांच्या घरावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी यावेळी स्थानिक नागरिकांकडून कसून चौकशी केल्याची माहिती पण समोर येत आहे. संभाव्य घातपाताचा संशय बळाव्याने एटीएसने तातडीने ही कारवाई केली. आज महाशिवरात्र आहे. अनेक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे. तर शिवजंयतीसह इतर प्रमुख कार्यक्रम, सण सुद्धा आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या कारवाईत काही जणांना ताब्यात घेण्यात आले असले तरी कुणाला अटक केली हे अद्याप समोर आलेले नाही.