लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही, तुम्ही…, तरुण शेतकऱ्याचा थेट बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन, पहा भरणे नेमकं काय म्हणाले?

एका तरुण शेतकऱ्याने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून आपल्या व्याथा मांडल्या आहेत. या शेतकऱ्याने थेट बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन केला, यावेळी त्यांनी देखील या तरुणाशी संवाद साधला.

लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही, तुम्ही..., तरुण शेतकऱ्याचा थेट बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन, पहा भरणे नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्याचा भरणे यांना फोन
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 12, 2026 | 10:02 PM

राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींचा धुरळा उडत असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक तरुण शेतकऱ्याने थेट शेताच्या बांधावरून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन लावून आपली व्यथा मांडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न केल्यानंतर अखेर रविवारी या शेतकऱ्याचा  संपर्क कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी झाला. यावेळी त्याने शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. अशोक माने, असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

आष्टी भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशोक माने यांनी संवादादरम्यान स्पष्ट केले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे पिके तर हातातून गेलीच आहेत, पण या संकटामुळे सामाजिक प्रश्नही गंभीर बनले आहेत. पाऊस नाही, पिके नाहीत, त्यामुळे मुलांची लग्नंही जमेनाशी झाली आहेत, अशी व्यथा त्यांनी यावेळी कृषी मंत्र्यांसोबत बोलताना मांडली. त्यामुळे  सरकारने आता अटी-शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक न करता, सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी अशोक माने यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान यावेळी अशोक माने यांच्यासोबत फोनवर बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं की,   एक चांगली कर्जमाफी झाली आहे, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले पाहिजेत, 40 हजार कोटींची कर्जमाफी असल्या अडचणीच्या काळात करण्यात आली आहे.  कुठलीही निवडणूक समोर नाहीये, तरी मोठी कर्जमाफी या ठिकाणी करण्यात आली. हा सरकारचा मोठा निर्णय आहे. याने सगळ्या शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही, कारण शेतकरी अडचणीत आहेत, मी देखील एक शेतकी आहे, असं भरणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. जे शेतकरी नियमित कर्जाची परत फेड करतात त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात येत होते, मात्र त्यांना देखील आता दोन लाखांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे.

 

 

Follow Us