आदित्य ठाकरेंकडून विधानसभेसाठी या दोन मतदारसंघांची चाचपणी?

या बैठकीला शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि माहिमचे शिवसेना आमदार सदा सरवणकर, वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंकडून विधानसभेसाठी या दोन मतदारसंघांची चाचपणी?

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट होतंय. कारण, यासाठी त्यांनी मतदारसंघाची चाचपणी केल्याचीही माहिती आहे. मुंबईतील वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेना पदाधिकारी आणि आदित्य ठाकरेंची बैठक सुमारे अर्धा तास चालली. या बैठकीला शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि माहिमचे शिवसेना आमदार सदा सरवणकर, वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.

या बैठकीत पावसाळी कामाचा आढावा घेण्यात आला. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी ते विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत सूचक विधान केलं. मी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबतचा निर्णय उद्धव साहेब आणि पक्षाचे नेते घेतील असं ते बैठकीत म्हणाले. त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांपैकी एकाने ‘साहेब, तुम्हीच मुख्यमंत्री’ अशी उस्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

माहीम आणि वरळी विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या मतांची तपशीलवार आकडेवारी घेऊन उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्यांना नवीन मतदार नोंदणीचे लक्ष्य ठरवून देण्यात आलं आहे. तसेच माहिम आणि वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला कुठल्या भागात मतदान कमी झाले आणि ते का ? याचा अभ्यास करण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वीही आदित्य ठाकरे यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार अशी चर्चा होती. पण शिवसेनेकडून या वृत्ताचं खंडण करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे सक्रिय राजकारणात दिसत आहेत. एनडीएच्या बैठकांनाही आदित्य ठाकरेंची उपस्थिती होती. शिवाय राज्यातील दुष्काळी भागातही आदित्य ठाकरेंनी दौरा केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *