सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ, 'लालबागचा राजा'च्या निर्णयावर शेलारांची नाराजी

गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ” अशी अपेक्षा आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. (Ashish Shelar Disappointed with Lalbaugcha Raja Decision)

सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ, 'लालबागचा राजा'च्या निर्णयावर शेलारांची नाराजी

मुंबई : संकट काळात सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा करता येऊ शकतो. मग गणेशभक्त आणि राजाची ताटातूट का?” असा सवाल विचारत भाजप नेते आशिष शेलार यांनी ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळाने गणेशमूर्ती स्थापन न करण्याच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. (Ashish Shelar Disappointed with Lalbaugcha Raja Decision)

“सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आला आहे, पण बाप्पा मार्ग काढेल! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी मूर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार आहेत, त्यांचे कौतुकच” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.

“लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबवण्याचा घेतलेला निर्णय “स्तुत्यच”..पण मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाएकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ” अशी अपेक्षा आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

“संकट मोठे आहे, अशा वेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाइन दर्शन सुद्धा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते! या देशात श्रद्धेला मोल नाही. श्रद्धा तोलूनही पाहता येत नाही. म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?” असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

काय आहे ‘लालबागचा राजा’चा निर्णय?

मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरानाचं संकट असल्याने यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवला जाणार आहे.

कोरोना लढ्यात जे पोलीस जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणाही मंडळाने केली.

मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

“लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे.” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

(Ashish Shelar Disappointed with Lalbaugcha Raja Decision)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *