हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा

कोरोनाविरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, विविध कंपन्या (Corona Virus CM Relief Fund) आणि व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत.

हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा

मुंबई : कोरोनाविरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, विविध कंपन्या (Corona Virus CM Relief Fund) आणि व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीश, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.

ठाणे जिल्हा सहकारी बँकेची 1 कोटी रुपयांची मदत

ठाणे जिल्हा सहकारी बँक लि. ने  ही  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

ज्येष्ठ नागरिक रविंद्र चौधरी यांच्याकडून 50 हजार रुपयांची मदत

पुण्याच्या कोथरुड येथील रहिवासी रविंद्र धनंजय चौधरी यांनीदेखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 50 हजार रुपये जमा केले आहेत. ते 67 वर्षांचे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौधरी यांचे आभार मानले आहेत. यावर चौधरी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

“मी एक ज्येष्ठ नागरिक असून  मी आणि माझा परिवार घरातच राहातो. बाहेर पडत नाही, कोरोना विषाणुशी लढतांना सगळ्यांनी असंच  वागलं पाहिजे, शासनाला सहकार्य केलं पाहिजे. आज राज्य आणि देश अडचणीत आहे. अशावेळी माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून 50 हजार रुपयांची मदत मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 खात्यात जमा करत आहे, मदतीचा खारीचा वाटा उचलत आहे”, असं रविंद्र चौधरी यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 314 कोटी रुपये जमा

राज्यातील जनता, स्वंयसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी वर्ग, लहान बालके आणि कार्पोरेट हाऊसेस यांनी सगळ्यांनी मिळून केलेल्या मदतीमुळे आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 314 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

दातृत्वाला मनापासून सलाम : मुख्यमंत्री

“कोरोनाशी लढतांना राज्यातील लहानथोर मंडळी शासनासमवेत मदतकार्यात उतरली असून या संकटाचा सामना करत आहेत. चौधरी यांच्यासारखे ज्येष्ठ नागरिक असोत किंवा आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणारी राज्यातील बालके असोत, शासनाला या आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या सर्वांच्या दातृत्वाला मला मनापासून सलाम करावा वाटतो. या सर्वांच्या सहकार्याने, स्वंयशिस्तीचे आणि नियमांचे कडक पालन करुन आपण कोरोनाला नक्की हरवू”, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19

कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

सढळ हाताने मदत करा

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांची रेल्वे, पोर्ट ट्रस्ट, लष्कराला विनंती, आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी

महसूल सोडा, सामाजिक विचार करा, चंद्रकांत पाटलांचा दारुविक्रीला विरोध

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *