मुंबईच्या लोकल रेल्वेवर दररोज 75 लाख प्रवाशांचा ताण, वर्षाला हजारो मृत्यू

दररोज लाखो प्रवासी या मुंबई लोकलने प्रवास करतात. ही लोकल म्हणजे मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. मात्र याच लोकलचा प्रवास किती जीवघेणा बनलाय हे काही आकडेवारी पहिल्यानंतर लक्षात येईल.

मुंबईच्या लोकल रेल्वेवर दररोज 75 लाख प्रवाशांचा ताण, वर्षाला हजारो मृत्यू

मुंबई : स्वप्नांची नगरी मुंबई.. या मुंबईतलं जगणं किड्या-मुंग्यांसारखं झालंय. हे जीवन जगणं किती हलाखीचं आहे याचा अनुभव मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वेची परिस्थिती पाहिली तरी येतो. दररोज लाखो प्रवासी या मुंबई लोकलने प्रवास करतात. ही लोकल म्हणजे मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. मात्र याच लोकलचा प्रवास किती जीवघेणा बनलाय हे काही आकडेवारी पहिल्यानंतर लक्षात येईल. लोकांना सुविधा मिळाव्या यासाठी सरकार आहे असं गृहित धरलं जातं. पण राज्यातील लोक एवढ्या वाईट अवस्थेत जगत असताना जगातील सर्वात मोठी लोकशाही आपण म्हणून घेतो. हक्क हा लोकशाहीचा गाभा आहे आणि इथे जगण्याचा हक्कच हिरावला जात असल्याचं चित्र आहे. सरकार बदलतं, मात्र मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं जगणं कायम तेच आहे.

लोकल रेल्वेवर दररोज 75 लाख प्रवाशांचा ताण

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 200 लोकल कार्यरत आहेत. या 200 लोकलच्या दिवसाला 2000 फेऱ्या होतात. मुंबई रेल्वेतून दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात. एका लोकलमधून 3 ते 4 हजार प्रवासी प्रवास करतात. लोकलच्या एका डब्यातून 150 ते 250 प्रवासी प्रवास करतात. दिवसेंदिवस मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अगदी किड्या-मुंग्यासारखे मुंबईकर या लोकलमधून प्रवास करतात. त्यात एखादी लोकल रद्द झाली म्हणजे त्या लोकलचे प्रवासी आणि पुढील लोकलची वाट पाहत असणारे प्रवासी अशी दुप्पट गर्दी होते आणि यातच अनेक अपघातही घडतात.

जीवघेणा प्रवास

मुंबई लोकलचा प्रवास अत्यंत धोकादायक होत चाललाय. अगदी दहशतवादी हल्यात जेवढी लोक मारली जात नाहीत त्यापेक्षा अधिक माणसं रोज मुंबई लोकलमधून पडून मरतात. मुंबईत दररोज 20 प्रवासी लोकल रेल्वे अपघाताचे शिकार होतात. किमान 10 प्रवाशांचा लोकल रेल्वे अपघातात मृत्यू होतो. दरवर्षी 7 हजार प्रवासी लोकल रेल्वे अपघाताचे शिकार होतात. दरवर्षी साडे तीन ते 4 हजार प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो.

या परिस्थितीमध्येही रेल्वे प्रशासनाचा एखादा चुकीचा निर्णय प्रवाशांच्या कसा जीवावर बेतू शकतो याचा प्रत्यय ठाण्यात आला. दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने मध्य रेल्वेसेवा पूर्णत: खोळंबली होती. त्यामुळे वर्किंग डे असतानाही रविवारच्या वेळा पत्रकाप्रमाणे लोकल गाड्या चालवल्याने मध्य रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. अशाच गर्दीत लोकल पकडताना रेल्वेतून पडून तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले.

रेल्वे प्रशासनाच्या एका चुकीमुळे या तिन्ही प्रवाशांचा आजचा रेल्वे प्रवास अखेरचा ठरला. इतकच नाही तर रेल्वे स्टेशनवरील अरूंद पूल देखील जीवघेणे बनत चालले आहेत. अरूंद रेल्वे पूल आणि वाढणारी प्रवासी संख्या यामुळे देखील दुर्घटना घडण्याच्या शक्याता आहेत. याआधी एल्फिन्स्ट रेल्वे स्टेशनवर देखील चेंगराचेंगरीची घटना घडली होती आणि अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

मुंबईची लोकसंख्या वाढत आहे आणि याचा ताण रेल्वे यंत्रणेवर येतोय. मात्र ज्या वेगाने प्रवासी वाढत आहेत, त्या वेगाने मुंबई लोकल रेल्वेची यंत्रणा बदलत नाही. वाढती लोकसंख्या आणि यंत्रणेवर पडणारा हाच ताण प्रवाशांच्या जीवावर उठलाय. कामावर जाण्यासाठी घराच्या बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी परत घरी येऊ का याचीही खात्री देता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *