11 मिनिटांत 7 स्फोट.. अन् ट्रेनमध्ये मृतदेहांचा ढीग; मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचं धडकी भरणारं ते भयानक दृश्य
11 जुलै 2006 रोजी मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिला. या बॉम्बस्फोटात 160 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

11 जुलै 2006 रोजी मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 160 जणांनी आपले प्राण गमावले होते. आजही त्या बॉम्बस्फोटाचा विचार करून देशवासीयांच्या मनात धडकी भरते. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लाइफलाइनमध्ये म्हणजेच लोकलमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 160 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 460 जण जखमी झाले होते. 11 मिनिटांच्या अंतराने लोकल ट्रेनमध्ये सात बॉम्बस्फोट झाले होते. आता या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची मुंबई हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
माटुंगा आणि मीरा रोडदरम्यान हे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. पाकिस्तानच्या ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेनं हा कट रचला होता. दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब बनवले होते. मकोकाच्या विशेष न्यायालयाने 2015 मध्ये 12 जणांना शिक्षा सुनावली होती.
नेमकं काय घडलं होतं?
- 11 जुलै 2006 च्या संध्याकाळी चाकरमानी ऑफिसमधलं आपलं काम संपवून घरी परतत होते. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होती. अनेकांना त्यांची नेहमीची लोकल पकडायची होती. परंतु हा आपल्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरणार, याची कल्पनासुद्धा कोणी केली नव्हती. घरी पोहोचण्याआधीच ते प्रवासी दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले होते. एकामागून एक सात बॉम्बस्फोट झाले होते. अवघ्या काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं होतं. माटुंगा आणि मीरा रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान 11 मिनिटांत 7 स्फोट झाले होते.
- हे स्फोट माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड स्थानकांवर झाले होते. या स्फोटांमध्ये 189 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 460 हून अधिक जण जखमी झाले होते. पहिला स्फोट संध्याकाळी 4.35 च्या सुमारास झाला. त्यानंतर पुढील 11 मिनिटांत आणखी स्फोट झाले.
- इतर दहशतवादी घटनांप्रमाणेच या हल्ल्यातही पाकिस्तानचा हात होता. लष्कर-ए-तोयबाने हा कट रचल्याचं तपासात दिसून आलं होतं. आझम चीमा हा मुख्य कट रचणारा होता. त्याने जिहादच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल केली आणि त्यांना मुंबईत हल्ले करण्यासाठी पाठवले.
- मुंबईतील या हल्ल्याला 7/11 बॉम्बस्फोट असंही म्हणतात. दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता. हे बॉम्ब आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळ्यांपासून बनवले होते. त्यांनी हे बॉम्ब सात प्रेशर कुकरमध्ये ठेवले होते. त्यानंतर ते टायमर वापरून उडवले होते. स्फोटांनंतर, प्रेशर कुकरचे हँडल ढिगाऱ्यात सापडले होते. यामुळे तपासात मदत झाली आणि नंतर एक-एक करून सर्व गोष्टी उघड झाल्या होत्या.
- या प्रकरणात सप्टेंबर 2015 मध्ये मकोका विशेष न्यायालयाने निकाल दिला होता. 12 जणांना शिक्षा सुनावण्यात आली होती. दहशतवाद्यांनी अतियशय क्रूर पद्धतीने हा हल्ला केला होता. त्यांनी सर्वसामान्य लोकांना लक्ष केलं होतं. या हल्ल्याने मुंबई शहर हादरलं होतं. लोकांमध्ये भीती आणि संतापही होता.
