Ahmedabad Plane Crash: मोठ्या जीवितहाणीनंतर DGCA ला आली जाग, एअर इंडियाच्या बोईंग विमानांबाबत मोठा निर्णय
अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. यात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. या मोठ्या जीवितहाणीनंतर DGCA ने एअर इंडियाच्या बोईंग विमानांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. यात विमानातील 241 लोकांचाही समावेश आहे. या मोठ्या जीवितहाणीनंतर DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) ला जाग आली आहे. आता डीजीसीएने एअर इंडियाच्या बोईंग विमानांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
डीजीसीएचा मोठा निर्णय
अहमदाबाद विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. डीजीसीएने एअर इंडियाच्या बोईंग 787-8/9 विमानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार इंधन पॅरामीटर सिस्टम तपासले जाणार आहे. तसेच विमान सुरक्षेचे प्रत्येक मानक तपासले जाणार आहे. तसेच टेकऑफ मानके देखील तपासली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
डीजीसीएच्या आदेशानंतर आता 15 जूनपासून देशातील विमानांचे टेकऑफ करण्यापूर्वी इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणालींची तपासणी केली जाणार आहे. तसेच केबिन एअर कंप्रेसर आणि संबंधित प्रणालींचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच इंजिनच्या इंधनावर चालणाऱ्या उपकरणांचीही तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर हायड्रॉलिक सिस्टमचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच सर्व विमानांच्या पॉवर अॅश्युरन्स तपासणी दोन आठवड्यांच्या आत करण्याची आणि गेल्या 15 दिवसांत B787-8/9 विमानात वारंवार झालेल्या बिघाडांची घेऊन त्याचा तपासणी अहवाल डीजीसीएकडे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
विमान अपघाताचा तपास AAIB करणार
अहमदाबादमधील विमान अपघातानंतर, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इतर केंद्रीय एजन्सींच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र या अधिकाऱ्यांनी तपासाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. सध्या या चौकशीची जबाबदारी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) कडे सोपवण्यात आली आहे. या विभागातील तपास अधिकारी आगामी काळात याचा अहवाल मंत्रालयाकडे सादर करणार आहेत.
गुरुवारी दुर्घटना घडली
गुरुवारी दुपारी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमानाला अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच एअर इंडियाचे विमान बीजे मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या विमानात दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. या अपघातात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक व्यक्ती या अपघातातून बचावला आहे.