फक्त 30 सेकंदात…विमान अपघाताच्या एकमेव साक्षीदाराने सगळं सांगितलं; विमानात काय घडलं?
अहमदाबाद विमान अपघातात एक मोठा चमत्कार झाला आहे. या अपघातात एक प्रवासी बचावला आहे. त्यानेच अपघातावेळी नेमकं काय झालं? याची माहिती दिली आहे.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथे 242 प्रवासी असलेलं प्रवासी वाहतूक विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेचे एनेक व्हिडीओ आता समोर आले आहेत. हवेत उड्डाण घेतल्यानंतर पुढच्याच काही सेकंदांत हे विमान थेट एका इमारतीवर आदळलं. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील होते. दरम्यान, या दुर्घटनेत फक्त एक प्रवासी वगळता अन्य सर्वांचाच मृत्यू झाला आहे. या प्रवाशाने विमानात नेमकं काय घडलं? याबाबत माहिती दिली आहे.
एकमेव प्रवासी वाचला
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे B-787 विमान आपल्या फ्लाईट AI-171 दरम्यान अहमदाबादहून लंडनला जाणार होते. त्यासाठी या विमानाने नियोजित वेळेनुसार उड्डाण घेतले होते. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे हे विमान हवेतून थेट एका इमारतीवर आदळले. या दुर्घटनेत एकूण 242 पैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात फक्त एक प्रवासी सुदैवाने वाचला आहे. या प्रवाशाचे नाव रमेश विश्वकुमार असे आहे. रमेश यांनीच विमानात नेमकं काय घडलं? याबाबत माहिती दिली आहे.
रमेश यांनी सांगितलं विमानात नेमकं काय घडलं?
रमेश विश्वकुमार या अपघातातून वाचले आहेत. विशेष म्हणजे भिंतीवर आदळल्यानंतर अपघातग्रस्त विमानाचा चक्काचूर झाला होता. विमानाला मोठी आग लागली होती. तरीदेखील रमेश विश्वकुमार या अपघातातून बचावले. त्यांना फार काही इजा झाली नाही. अपघातानंतर ते चालत-चालत बाहेर आले. त्यांच्या अंगावर काही जखमा होत्या. पण ते बोलू शकत होते. त्यांनीच सांगितल्यानुसार विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीस सेकंदांत या विमान कोसळलं. मात्र त्याआधी विमानात स्फोट झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
रमेश विश्वकुमार यांच्यावर उपचार चालू
दरम्यान, रमेश विश्वकुमार यांच्यावर बीजे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार चालू आहे. तर उर्वरित मृत प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना डीएनए सॅम्पल देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर ज्या वसतीगृहावर हे विमान आदळले होते, तेथील विद्यार्थ्यांवरही सध्या उपचार करण्यात येत आहेत.
