Ahmedabad Plane Crash: पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी दाखल, विजय रुपाणी यांच्या परिवाराची घेणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे अपघातस्थळी, सिव्हील हॉस्पिटलमध्ये सुरक्षा कठोर करण्यात आली आहे. पंतप्रधान अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमार यांची भेट घेतील. तसेच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांनाही भेटणार आहेत.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पायी चालत संपूर्ण परिसराची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत इतर मंत्री आणि अधिकारी देखील उपस्थित आहेत. पंतप्रधान अमदाबादमधील सिव्हील हॉस्पिटलमध्येही जाणार आहेत. त्या ठिकाणी दाखल असलेल्या जखमींची चौकशी करणार आहेत. तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघाताशी संबंधित आढावा बैठक घेणार आहेत.
विश्वास कुमार यांची भेट घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा विमानाचा अपघात झालेल्या घटनास्थळी पोहोचला आहे. त्यांच्यासोबत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू हे देखील आहेत. पंतप्रधान मोदी येण्यापूर्वीच अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमार यांची भेट घेतील. तसेच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांनाही भेटणार आहेत. एअर इंडियाच्या विमान अपघातात विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला आहे.
#WATCH | PM Modi arrives at Ahmedabad Civil Hospital to meet those injured in AI-171 plane crash pic.twitter.com/Rj1y7U916f
— ANI (@ANI) June 13, 2025
सिव्हील हॉस्पिटलमध्ये सुरक्षा कठोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे अपघातस्थळी, सिव्हील हॉस्पिटलमध्ये सुरक्षा कठोर करण्यात आली आहे. विशेष सुरक्षा गटाच्या (एसपीजी) सूचनेनुसार अहमदाबाद पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. अपघातामधील जखमींवर सी ७ इमारतीत उपचार सुरू आहेत, त्याभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिस कमिशनर जी. एस. मलिक उपस्थित आहे.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
अहमदाबादमध्ये एअर इंडिया एआय-१७१ विमान अपघाताच्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी टीम ढिगाऱ्यांची तपासणी करणार आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अनेक केंद्रीय एजन्सी सक्रिय आहेत.
अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. विमानात १२ क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते. या विमानात ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन प्रवासी आणि १६९ भारतीय नागरिक होते. या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तसेच विमानाची धडक बसून २४ जणांचा मृत्यू झाला. हे विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले होते.