Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण, आज DNA चाचणी
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाची भीषण दुर्घटना घडली आहे. 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या सुरू आहेत. नातेवाईकांना मदत केंद्र उभारण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे शोधण्याचे कार्य सुरू झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट देणार आहेत.

अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण भारतासह जगाला हादरवलं आहे. 242 प्रवाशांसह लंडनला जाणारं विमान काल दुपारी (12 जून) टेकऑफ नंतर अवघ्या काही क्षणात खाली कोसळलं आणि मेघानी येथील नागरी वस्तीत कोसळलं. यामध्ये 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये विमान प्रवाशांसह, विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाला धडकलं तेथील काही विद्यार्थ्यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. टेकऑफनंतर विमान काही क्षणात खाली कोसळलं आणि आगीचे मोठे लोळ उठले, त्यामुळे अनेक प्रवासी होरपळले, गंभीर जखमी झाले. विमानातील प्रवाशांमध्ये भारतीय नागरिकांसह, ब्रिटनचे तसेच पोर्तुगीज आणि कॅनडाच्या नागरिकांचाही समावेश होता.ब्या
डीएनए चाचणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार
दरम्यान या अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण येत असून त्यामुळेच आज सर्व मृतदेहांच्या डीएनए चाचण्या होणार आहेत. मृतकांचे नातेवाईक आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या मृतदेहांचे डीएनए तपासणार आहेत. विमान अपघातावेळी झालेल्या ब्लास्टमुळे मृतदेह ओळख न पटण्याच्या पलीकडच्या अवस्थेत आहेत. काही मृतदेहांवर सध्या शवविच्छेदन केले जात आहे तर दुसरीकडे डीएनए चाचण्या होणार आहेत. आतापर्यंत 192 नातेवाईकांचे डीएनए चाचण्यांसाठी नमुने घेण्यात आले.
मृतकांच्या नातेवाईकांना रुग्णालयातल्या एका हॉलमध्ये थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे त्यांच्या वैद्यकीय चाचण्या , उदाहरणार्थ डीएनए आणि इतर नमुने घेतले जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू तरळत असून काळजी घेण्यासाठी वेगवेगळे डॉक्टरांचे पथक आणि पोलिसांचे युनिट उपस्थित आहे. 192 हून अधिक नातेवाईकांचे आतापर्यंत डीएनएसाठी नमुने घेण्यात आलेत मात्र रिपोर्ट्स प्रलंबित आहेत. अजूनही डीएनए चाचण्यांसाठी नमुने घेण्याचे काम सुरू आहे. तर अजूनही काही नातेवाईक रुग्णालयात पोहोचत आहेत.
अहमदाबाद विमान दुर्घटनेचे पोस्टमार्टम सुरू
दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेचे पोस्टमार्टम सुरू झालं आहे. विमानातील कॉन्फिगरेशन एरर हे भारतातील सर्वात मोठ्या एअर क्रॅशला कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. काल, अर्थात 12 जून 2025 रोजी दुपारी 1:38 वाजता अहमदाबादहून लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं फ्लाइट AI171 (बोईंग 787-8) टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळलं. या दुर्घटनेमागे सर्वाधिक शक्यता टेकऑफ दरम्यान ‘कॉन्फिगरेशन एरर’ची (फ्लॅप्स चुकीचे, इंजिन थ्रस्ट कमी, वेळेपूर्वी रोटेशन, गियर न उचलणे) आहे.
विमान उड्डाणानंतर केवळ 825 फूट उंचीवर आणि 174 नॉट्स (320 किमी/ता.) वेगावर होतं, जे अत्यंत कमी आहे. मात्र 43°C तापमानामुळे इंजिन परफॉर्मन्स आणि लिफ्ट दोन्हीवर परिणाम झाला. जड वजन आणि गरम हवामानात अत्यंत अचूक सेटींग लागते, आणि ते चुकल्यास भीषण परिणाम होतो. अपघाताच्या क्षणाला गियर खालीच होते, म्हणजे टेकऑफ क्लाइंब पूर्ण झाला नव्हता. मानवी चूक, फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टीममधील चुकीची माहिती, किंवा पायलट्समधील समन्वयाचा अभाव हेही महत्त्वाचे घटक ठरू शकतात. इंजिन फेल्युअर, बर्ड स्ट्राइक किंवा तापमानाशी संबंधित इतर तांत्रिक अडचणी दुय्यम कारणं मानली जात आहेत.
एअरपोर्ट अथॉरिटीने सुरू केलं मदत केंद्र
अहमदाबादमधील कालच्या विमान अपघातानंतर, एअरपोर्ट अथॉरिटीने (airport authority)T2 येथे एक मदत केंद्र सुरू केले आहे. या मदत केंद्रात airport कर्मचारी तैनात आहेत आणि येथे येणाऱ्या सर्व मृतांच्या नातेवाईकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना मदत केली जात आहे. आणि रुग्णालयात जाण्यासाठी या मदत केंद्रामार्फत मोफत बस आणि टॅक्सीची सुविधा देखील उपलब्ध आहे. येथे एक हेल्पलाइन नंबर देखील नमूद केला आहे जो नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य वापरू शकतात. बाहेरून येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांसाठी येथे बसण्याची आणि नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया विमानाला काल झालेल्या अपघात नंतर सध्या जखमी आणि मृतदेह ठेवण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कालच्या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा रुग्णालयात येऊन गेले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर काही नेते ही येणार असल्याने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पोलिस कमिशनर जी . एस मलिक यांनी हॉस्पिटल मधील आढावा घेतला आहे.