देशातील सर्वात जुना पक्ष, पण अनुमोदक मिळण्याची मारामार, उमेदवाराचा अर्जही बाद; मोदींच्या गुजरातेत काँग्रेस दयनीय

| Updated on: Apr 21, 2024 | 4:04 PM

Nilesh Kumbhani Nomination News : गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरात लोकसभा निवडणुकीत मतदानापूर्वीच एक जागा भाजप बिनविरोध खिशात टाकण्याची शक्यता आहे. सुरतमधील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांना त्यांच्या तीन प्रस्तावांपैकी एकही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर करता आले नाही.

देशातील सर्वात जुना पक्ष, पण अनुमोदक मिळण्याची मारामार, उमेदवाराचा अर्जही बाद; मोदींच्या गुजरातेत काँग्रेस दयनीय
नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद
Follow us on

गुजरात लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानापूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसला तर भाजप एक जागा बिनविरोध निवडून आणण्याच्या खटाटोपात गुंतली आहे. सुरत लोकसभा मतदार संघात काँग्रेसने नीलेश कुंभाणी यांना तिकीट दिले. त्यांनी निवडणूक अर्जासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. पण त्यांच्या नामनिर्देशन पत्रावरील तीन अनुमोदकांच्या स्वाक्षरीवर हरकत घेण्यात आली. भाजपचे दिनेश जोधानी यांनी हे हस्ताक्षर बनावट असल्याचा दावा केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांनी बाजू मांडण्यासाठी पुरेसा कालावधी दिला. पण जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे तीनही अनुमोदक काही आले नाही. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात आले.

बाजू मांडण्यासाठी दिला कालावधी

  • काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी आणि डमी उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यावरील अनुमोदकाच्या स्वाक्षरीवरुन वाद झाला. भाजप उमेदवार दिनेश जोधानी यांनी त्यावर आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुंभाणी यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला. 21 एप्रिल रोजी 11 वाजता काँग्रेस पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांचे दोन्ही अर्ज बाद करण्यात आले.
  • ‘माझे सकाळीच अनुमोदकांशी बोलणे झाले होते. त्यांनी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचण्याचे आश्वासन दिले होते. आम्हाला आशा होती की ते येतील. पण त्या सर्वांनी मोबाईल बंद केले,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी दिली. तर त्यांचे वकील बाबू मांगुकीया यांनी आमचे तीनही अनुमोदकांचे अपहरण झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अर्जावर स्वाक्षरी झाली की नाही, याची नाही तर अपहरणाची चौकशी करायला हवी. स्वाक्षरीची पडताळणी न करताच नामनिर्देशन पत्र रद्द करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी मांडले.

आता कोर्टाचा ठोठावणार दरवाजा

हे सुद्धा वाचा

अनुमोदकांचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिल्याची माहिती वकील मांगुकीया यांनी दिली. पण पोलिसांनी याप्रकरणी काहीच कारवाई न केल्याचा आरोप त्यांनी लावला. याप्रकरणात आता हायकोर्टात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. तर काँग्रेसमधूनच नीलेश कुंभाणी यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. नीलेश कुंभाणी यांना तिकीट देणे हेी काँग्रेसची मोठी चूक होती. ते विकल्या गेल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते असलम सायकलवाला यांनी केला. त्यांचे नातेवाईकच अनुमोदक होते, मग ते कसे गायब झाले? स्वतः कुंभाणीच संशयाच्या घेऱ्यात असल्याचा आरोप सायकलवाला यांनी केला.

अपक्ष आणि छोटे पक्ष उरलेत मैदानात

सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपसह काँग्रेस मिळून एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. यामध्ये 12 जणांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले आहे. तर तितकेच रद्द करण्यात आले आहे. 22 एप्रिल म्हणजे उद्या उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. जर अपक्ष आणि छोट्या पक्षातील उमेदवारांनी निवडणुकीतून मागे घेतली तर भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो.