Explain : तहव्वूर राणाला दिलं पण डेविड हेडलीला अमेरिका कधीच भारताच्या ताब्यात देणार नाही, कारण….
तहव्वूर हुसैन राणाच ताब्यात येणं हे भारताच नक्कीच कूटनितीक यश आहे. पण डोविड कोलमन हेडलीच काय? हा हा प्रश्न उरतोच. कारण डेविड हेडली मुंबई 26/11 हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्याशिवाय तपास पूर्णच होऊ शकत नाही. पण अमेरिका डेविड हेडलीला कधीच भारताच्या ताब्यात देणार नाही, ते अशक्य आहे का ते समजून घ्या.

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एक आरोपी तहव्वूर हुसैन राणाच अखेर प्रत्यर्पण झालं आहे. NIA आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी काल अमेरिकेतून विशेष विमानाने राणाला घेऊन भारतात परतले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या 16 वर्षानंतर तहव्वूर हुसैन राणा भारताच्या ताब्यात आला आहे. यासाठी अनेक वर्ष भारतीय यंत्रणा अमेरिकेत कूटनितीक, कायदेशीर लढाई लढत होत्या. आज इतक्या वर्षानंतर तहव्वूर हुसैन राणाचा भारताला ताबा मिळणं हे आपलं कूटनितीक यश नक्कीच आहे. पण पण डेविड हेडलीच काय? हा प्रश्न उरतोच. कारण डेविड हेडली मुंबई 26/11 हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्याशिवाय तपास पूर्णच होऊच शकत नाही. कारण या तहव्वूर राणाने हेडलीच्या सांगण्यावर मुंबईत रेकी केली होती. कुठे दहशतवादी हल्ला करायचा? त्याची पाहणी केली होती. म्हणजे तहव्वूर राणा एक छोटा मासा आहे, तर हेडली बिग फिश आहे.
पण अमेरिका डेविड कोलमन हेडलीला कधीच भारताच्या ताब्यात देणार नाही. कारण त्याचं अमेरिकी सरकारसोबत डील झालेलं आहे. एक मोठ्या वेबसाइटने गुप्तचर यंत्रणातील सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. कायदेशीर, कूटनितीक आणि रणनितीक कारणांमुळे अमेरिका कधीच हेडलीला भारताकडे सोपवणार नाही. ज्यांच्याकडे अमूल्य गोपनीय माहिती आहे, त्यांचं नियंत्रण आपल्याकडेच ठेवण्याला अमेरिकेच प्राधान्य असतं, भले मग तो इतर देशांच्या दृष्टीने गुन्हेगार असो.
काय करार झालाय?
भारत, पाकिस्तान आणि डेन्मार्ककडे प्रत्यर्पण होऊ नये, यासाठी डेविड हेडलीने 2010 साली अमेरिकन यंत्रणांसोबत एक करार केला. हा करार अमेरिकन यंत्रणांना सहकार्य करण्याचा होता, असं सूत्रांनी सांगितलं. डेविड हेडलीने तहव्वूर राणा तसच अन्य प्रकरणात जी माहिती दिली, साक्ष दिली, त्या बदल्यात त्याचं प्रत्यर्पण आणि मृत्यूदंडाची शिक्षा देता येणार नाही. अमेरिकेसाठी तो संरक्षित साक्षीदार आहे. मुंबई हल्ल्यातील त्याचा सहभाग तसेच लष्कर-ए-तयबा आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI सोबत असलेले त्याचे कनेक्शन, त्याने दिलेली माहिती अमेरिकन तपास यंत्रणांसाठी खूप महत्त्वाची आहे.
अमेरिकेचा दुटप्पीपणा
डेविड हेडलीच भारत किंवा डेन्मार्ककडे प्रत्यर्पण केल्यास अमेरिकन यंत्रणांच्या शब्दावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पुढे कुठला गुन्हेगार त्यांना सहकार्य करण्याआधी दहावेळा विचार करेल. त्यामुळेच ते डेविड हेडलीला कधीच भारताच्या ताब्यात देणार नाहीत. डेविड हेडली हा डबल एजंट असल्याचही म्हटलं जातं. भले, तो भारताचा शत्रू असेल, पण त्याने पाकिस्तानी ISI आणि अमेरिकन यंत्रणांसाठी सुद्धा काम केल्याच बोललं जातं. त्यामुळे दहशतवादाविरुद्ध आमची लढाई आहे, असं अमेरिका सांगत असली, तरी ते स्वहिताला प्रथम प्राधान्य देतात.