CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO
CJP Protest : रात्री पुन्हा एकदा आंदोलक जंतर मंतरवर परतले. दिल्लीत मुसळधार पाऊस कोसळला. आंदोलकांना पांगवण्यासाठी वीज पुरवठा सुद्धा खंडीत करण्यात आला होता. पण आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यांनी मैदान सोडलं नाही.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल दिल्लीत मोठं आंदोलन झालं. तरुणाई मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. काल या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला. अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले. रात्री पुन्हा एकदा आंदोलक जंतर मंतरवर परतले. दिल्लीत मुसळधार पाऊस कोसळला. आंदोलकांना पांगवण्यासाठी वीज पुरवठा सुद्धा खंडीत करण्यात आला होता. पण आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यांनी मैदान सोडलं नाही. सकाळी पाचच्या सुमारासही सीजेपीच्या कार्यकर्त्यांच आंदोलन हे जंतर-मंतर परिसरात सुरुच आहे. काल रात्रीपासून या ठिकाणी पाऊस सुरू आहे तरी देखील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवलं आहे.
सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून जंतर-मंतर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. याठिकाणी काल रात्रीपासून पाऊस पडत असल्यामुळे चिखल झाला होता आणि घाण या परिसरात जमा झाली होती. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण सुरु होतं. ज्या मंडपात हे आंदोलन सुरु होतं, त्याचा ताबा आता अभिजीत दीपके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जंतर-मंतर परिसरात तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. सीजेपीच्या प्रवक्त्यांना जेपी नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं. पण त्यातून तोडगा निघाला नाही. आंदोलन स्थगित होणार नाही अशी भूमिका अभिजीत दीपके यांनी घेतली आहे.
सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर-मंतरवर यावं
पोलिसांनी काल आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. काल पोलीस आणि विद्यार्थी दोघे जखमी झाले. आता सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर-मंतरवर यावं. आम्ही कुठेही जाणार नाही, अशी ठाम भूमिका अभिजीत दीपके यांनी घेतली आहे. ज्यांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, त्यांना जंतर-मंतरवर जमण्याचं आवाहन दीपके यांनी केलं आहे. आज किती मोठ्या संख्येने लोक येतात याची उत्सुक्ता आहे. काल रात्री पाऊस होता. या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झालेला. त्यामुळे सकाळी सीजेपीकडून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.