विमान अपघातातील मृतांचा आकडा किती? अमित शहा म्हणाले…
अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यानंतर अमित शाह यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात.

अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली आणि दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाचीही भेट घेतली. यानंतर शाह यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. अमित शाह यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले अमित शाह?
अमित शाह यांनी म्हटले की, विमान दुर्घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. विमानात देशातील आणि परदेशातील एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. या प्रवाशांपैकी एक बचावला आहे. मी त्याला भेटलो आहे. डीएनए चाचण्या आणि ओळख पटल्यानंतरच मृतांची संख्या अधिकृतपणे जाहीर केली जाईल. गुजरात सरकारच्या सर्व विभागांनी मिळून बचाव कार्य केले.
पुढे बोलताना शाह म्हणाले की,’विमानात असलेल्या १.२५ लाख टन इंधनामुळे कोणीही वाचवण्याची शक्यता नव्हती. मी घटनेच्या ठिकाणीही भेट दिली आहे. सर्वांना बाहेर काढण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. डीएनए नमुने घेण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल. १,००० हून अधिक डीएनए चाचण्या कराव्या लागतील आणि त्या सर्व गुजरातमध्ये केल्या जातील.’
कोणत्या देशाचे किती प्रवाशी?
एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहानमुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता यातील 241 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पायलटचे नाव काय? किती होता अनुभव?
समोर आलेल्या माहितीनुसार, या विमानाच्या पायलटचे नाव कॅप्टन सुमित सभरवाल आहे. सुमित यांना ८२०० तास विमान उडवण्याचा अनुभव आहे. तसेच या विमानाच्या सह-वैमानिकाला ११०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर लगेचच ते विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.
